ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची कारणे शोधून त्याठिकाणी तात्पुरती किंवा कायमस्वरुपी उपाययोजना करता येऊ शकते का, याची चाचणी सर्व यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. ठाणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील इतर प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्डे पालिका बुजवेल, असे स्पष्ट करत नव्या रस्त्यांवर देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत पडलेले खड्डे संबंधित ठेकेदाराने बुजविले नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात  येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रस्ता हे राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित येत असून या रस्त्यांवर दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डे पडल्यानंतर हद्द वादचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. गेले अनेक वर्षे हद्द वादामुळे नागरिकांचा खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास सुरू असतानाही या रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली होती. रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले होते. त्यापाठोपाठ त्यांनी गुरुवारी सह पोलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांंच्यासोबत कापुरबावडी भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीची पाहाणी करून त्याचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोंडी सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

हेही वाचा >>>सात लाखाची लाच मागणाऱ्या कल्याणमधील पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा

ठाणे महापालिका क्षेत्रात वाहतुक सुरळीत रहावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही असून त्यांचे ठाण्यातील वाहतूकीवर बारीक लक्ष आहे.  यामुळेच विविध यंत्रणांच्या एकत्रीकरणातून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधण्यात येत आहे. या मार्गांवर कोणत्या कारणांमुळे कोंडी होते, याचा आढावा घेण्यात येत आहे. अरुंद रस्ता, सिग्नल यंत्रणा आणि खड्ड्यांंमुळे कोंडी होत असेल तर तिथे उपाययोजना करण्यात येत आहे, अशी माहीती आयुक्त राव यांनी दिली. ठाणे शहरातून जाणाऱ्या इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याची तक्रार प्राप्त झाली तर पालिकेकडून हे खड्डे तात्काळ बुजविण्यात येतील. तसेच नव्या रस्त्यांवर देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत खड्डे पडले आणि संबंधित ठेकेदाराने ते बुजविले नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal commissioner information about the measures to solve the traffic jam amy