ठाणे : शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, गायमुख घाट परिसरातील कामांची पाहाणी करत रस्ते दुरुस्तीची सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करून सर्व रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिले. दर पंधरा दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही निर्देशही त्यांनी दिले आहेत.

पावसाळ्यापुर्वीची कामे करण्यासाठी ठाणे महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधिक्षक अभियंता अभिजीत दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी करताना वाहतूक कोंडीची सर्व ठिकाणे लक्षात घेऊन त्यावर कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, यावर चर्चा करण्यात आली. घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईल. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही हे पहावे, असे निर्देश देत खड्डेमुक्त ठाण्यासाठी सर्व प्रयत्नशील असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

माजीवडा ते कॅडबरी जंक्शन सेवा रस्त्यावर जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. ज्या भागात जलवाहिनी अंथरून झाली आहे, तिथे तातडीने रस्ता वाहतूक योग्य करावा तसेच हे जलद पूर्ण करून पूर्ण सेवा रस्ता वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम मार्गी लागेपर्यंत अधिक वाहतूक सेवक तैनात करावेत. त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायम सतर्क असावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी दिली. २० एप्रिलपर्यंत कापूरबावडी येथील पेपर कंपनी लगतचा छोटा पूल लहान वाहनांसाठी खुला केला जाईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गायमुख घाट येथे ८०० मीटर रस्त्याची गतवर्षीप्रमाणेच दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी, आयआयटीमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उड्डाणपूल डेडलाइन

भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल १५ एप्रिलपर्यंत आणि कासारवडवली येथील उड्डाणपूल १५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एम एम आर डी चे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मेट्रो मार्गाखालील रस्त्यावर असलेल्या उंच सखलपणा पावसापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी, कासारवडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले महावितरणचे काम त्यांनी जलद स्थलांतरित करण्याची सुचना आयुक्त राव यांनी केली.

पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटलगतच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या कामाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर, कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शन पर्यंत मेट्रो तसेच जल वाहिनीच्या कामाची पहाणी करण्यात आली. या भागात रस्त्याची दुरुस्ती तसेच, नाल्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याबाबत तातडीने नियोजन करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिले. घोडबंदर रोड सेवा रस्ता, उड्डाणपूलच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे यांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर, पातलीपाडा उड्डाणपुल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली उड्डाणपूलाखाली रस्ता, भाईंदरपाडा उड्डाणपूल, त्या खालील रस्ता, नागला बंदर जंक्शन, गायमुख घाट परिसर यांचीही पाहणी करण्यात आली.