महापालिका क्षेत्रातील पावसाळी पाणी वाहू नेणाऱ्या गटारावरील तुटलेली झाकणे तातडीने बसविण्याचे आदेश देत याठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारच्या बैठकीत दिला. शहरातील कामासंदर्भात जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याबरोबरच त्याचा अभिप्रायही द्या तसेच लोकप्रतिनिधींकडून आलेल्या तक्रारींना गांभिर्यांने घेवून त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> मनसे आमदार प्रमोद पाटील याचे मोदींसोबत उत्तर प्रदेशात लागले पोस्टर, दिले नोकरीचे आश्वासन, नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी पालिकेच्या विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी विभागप्रमुखांना महत्वाच्या सुचना केल्या. पावसाळी पाणी वाहू नेणाऱ्या गटाराचे चेंबर उघडे असतील किंवा झाकणे तुटलेली असतील तर तातडीने त्या ठिकाणी झाकणे बसविण्याची कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी दिले. याठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल असा इशारा देत याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, रस्ते आणि शौचालयांची स्वच्छतांची कामे सुरू असून या कामांचा त्यांनी आढावा यावेळी घेतला. बहुतांश प्रभाग समितीतील सौंदर्यीकरणाची कामे ही पुर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित कामांची गती वाढवून ही कामे १५ जानेवारीपर्यत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा >>> डोंबिवलीत नेहरु रस्त्यावर मोटारींचे वाहनतळ ; नेहरु रस्ता कोंडीच्या विळख्यात
सर्व प्रभाग समितीमधील सार्वजनिक शौचालयांची पाहणी करुन शौचालयामध्ये छतावरच्या टाकीद्वारे पाणी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी ज्या शौचालयांवर पाण्याच्या टाक्या नाहीत, अशी शौचालये निश्चित करुन अशा शौचालयावर पाण्याच्या टाक्या बसवून नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. ज्या शौचालयांवर इमारतीची क्षमता नसल्यामुळे टाकी बसविणे शक्य नाही, अशा शौचालयांच्या ठिकाणी जमिनीवर लोखंडी सांगाडा त्यावर पाण्याच्या टाक्या बसवाव्यात. तसेच पाण्याची जोडणी देणे शक्य नसेल तर कुपनलिका उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व शौचालयात दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश करता येईल, अशा पद्धतीने रॅम्प उपलब्ध करुन द्यावेत. ज्या ठिकाणी कडीकोयंडे तुटलेले असतील, ते दुरूस्त करुन घ्या. सार्वजनिक शौचालयांसाठी दिशादर्शक फलक अत्यंत महत्वाचे असून त्यांची उपलब्धतता करण्याबरोबरच भिंतींवर सूचनादर्शक फलक असावेत या द्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करणे सोईचे होईल, अशा सुचनाही त्यांनी केल्या.
प्रवेशद्वार लक्षावेधी असावेत ठाणे शहरातील आनंदनगर, खारीगांव, गायमुख, डायघर, भिवंडी, विटावा, पलावा, कशेळी ही शहराच्या प्रवेशद्वाराची ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणची प्रवेशद्वारे उभारताना ते लक्षवेधी असावेत, त्यावर ठाणे शहराचे प्रतिनिधीत्व करणारा संदेश असावा. प्रवेशद्वारे ही शहराची आहेत, त्यामुळे शहरातील लोककला, लोकसंस्कृती, लोकजीवन हे सर्व त्यावर अपेक्षित असून तलावांचे शहर अशी जी शहराची ओळख आहे, त्याचे प्रतिबिंब त्यावर उमटले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून सर्व प्रवेशद्वारांचे काम करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी सर्व संबंधितांना बैठकीत दिल्या.