ठाणे : शहरातील विविध भागात सुरू असलेली रस्ते कामे पुर्ण करण्यासाठी मुदत उलटल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता पावसाळ्यापुर्वी ही कामे उरकण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या ४८ तासात रस्ते कामे पुर्ण करण्यासंबंधीच्या नोटीसा आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठेकेदारांना पाठविल्या असून यामुळे ठेकेदार धास्तावले आहेत. अभियंत्यांकडून खोदकामास परवानगी मिळत नसून त्याचबरोबर शहरात पाऊसही सुरू झाला आहे. अशा परिस्थिती कामे कशी करायची असा प्रश्न ठेकेदारांपुढे उभा राहिला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये २८४ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. हि कामे पुर्ण करण्यासाठी ३१ मे ची मुदत देण्यात आली होती. परंतु ही मुदत उलटूनही शहरात रस्ते कामे अद्याप सुरूच असल्याचे चित्र आहे. ही कामे पावसाळ्यापुर्वी उरकण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाऊले उचलली असून त्यासाठी संबंधित ठेकेदारांना नोटीसा पाठविल्या आहेत. त्यात रस्त्यांची कामे पुर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, बांधकाम साहित्य आणि अनुषांगिक यंत्रसामुग्री वाढविण्याच्या सुचना देऊनही त्याबाबत कोणतेही प्रयत्न केले गेले नाही, असे म्हटले आहे. तसेच लवकरच पावसाळा सुरू होणार असून त्यादरम्यान रस्त्यांच्या कामामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची राहील आणि ही सर्व कामे ४८ तासात पुर्ण करण्यात यावीत, असे आदेश नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. या नोटीसांमुळे ठेकेदार धास्तावले आहेत.

हेही वाचा >>>ठाणे: जाहीरात फलक पडून जिवीतहानी झाल्यास मालकावर गुन्हा दाखल होणार

ठेकेदारांपुढे पेच

रस्ते कामे पुर्ण करण्यासाठी ३१ मे ची मुदत देण्यात आली होती. परंतु एकाच वेळी सर्वच ठिकाणी रस्ते कामे सुरू असल्याने बांधकाम साहित्य उपलब्ध होत नव्हते आणि त्याचबरोबर मजुरांचाही तुटवडा जाणवत होता. यामुळे ठेकेदारांची मोठी अडचण झाल्याने ही कामे लांबणीवर पडण्याची भिती व्यक्त होत होती. त्यापाठोपाठ आता आयुक्तांच्या आदेशानुसार भरपावसात ४८ तासात रस्ते कामे कशी पुर्ण करायची असा प्रश्न ठेकेदारांपुढे उभा राहिला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूची कामे पुर्ण झाली आहेत तर, दुसऱ्या बाजूचे काम करण्यासाठी खोदकाम करावे लागणार आहे. त्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून पालिका अभियंत्यांकडून परवानगी दिली जात नाही. त्यातच आता पाऊसही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत रस्ते कामे कशी करायची, असा पेच निर्माण झाल्याचे काही ठेकेदारांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील पोलीस अधिकारी शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

अंतिम टप्प्यात असलेल्या रस्ते कामांसाठी नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांना ४८ तासात रस्ते कामे कशी पुर्ण करायचे आदेश दिले आहेत. परंतु शहरात पाऊस सुरू झाल्याने कामे थांबविण्यात आली आहेत. तसेच रस्ते खोदकामासाठी कोणाचीही परवानगी अजूनपर्यंत थांबविण्यात आलेली नाही. – अभिजीत बांगर,आयुक्त, ठाणे महापालिका