ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर * निवडणुकीच्या तोंडावर करवाढीला बगल * वाढलेल्या उत्पन्नामुळे घोषणांची जंत्री
जयेश सामंत- नीलेश पानमंद, लोकसत्ता
कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेला उलटपक्षी ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या मालमत्तांना करमाफी मिळेल हे गृहीत धरणारा आणि सत्ताधारी शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हवाहवासा वाटणारा ठाणे महापालिकेचा आगामी वर्षांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी गुरुवारी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यापुढे सादर केला.
ठाणे : गतवर्षी ठाणे महापालिकेतील आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात मोठय़ा घोषणा, प्रकल्पांचा मोह टाळून शिस्तीचा अर्थसंकल्प सादर करणारे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आगामी आर्थिक वर्षांत मात्र, घोषणांचा पाऊस पाडला. महापालिका आयुक्तांनी गुरुवारी सादर केलेल्या २०२२-२३च्या अर्थसंकल्पावर पूर्णपणे सत्ताधारी शिवसेनेची छाप असल्याचे दिसून आले. महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना शिवसेनेचे नेते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना पालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेपूर स्थान देण्यात आले. एवढेच नव्हे तर, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करून आयुक्तांनी शिवसैनिकांसाठी भावनिक असलेल्या मुद्दय़ालाही स्थान दिले.
करोनाकाळात पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. शर्मा यांचा बराचसा कार्यकाळ साथ नियंत्रण आणि त्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये गेला. त्यानंतरही आयुक्त हातचे राखून खर्च करतात, असे चित्र होते. नवीन प्रकल्प, योजना राबवल्या जात नसल्याबद्दल अगदी सत्ताधारी शिवसेनेच्या बाकांवरूनही तीव्र नाराजी व्यक्त होत होती. आयुक्तांकडून कामांच्या फायलीही तातडीने मंजूर होत नाहीत, असा आरोप होत होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात डॉ. शर्मा नवीन घोषणा करतील, याबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येही साशंकता होती. मात्र, पालिका आयुक्तांच्या पोतडीतून गुरुवारी बाहेर पडलेल्या अर्थसंकल्पावर निवडणुकीची आणि शिवसेनेची दोन्हींची छाप दिसून आली.
जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात आनंद दिघे यांचा जयंती उत्सव शिवसेनेने मोठय़ा धडाक्यात साजरा केला होता. दिघे वापरत असलेल्या वाहनाचे नूतनीकरण करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना पुन्हा एकदा भूतकाळात जाण्यास भाग पाडले होते. भावनिक राजकारणाचा हा झरा असा भरभरून वाहत असताना आयुक्तांनी थेट स्वर्गीय दिघे यांच्या स्मारकाची घोषणा करत आणखी एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या स्मारकासोबत शहर सौंदर्यीकरण, फिल्म इन्स्टिटयूट, वागळे इस्टेट येथे नाटय़गृह, भंडार्ली येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प अशा नव्या प्रकल्पांची घोषणा करत आयुक्तांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेल्या वचननाम्याची री अर्थसंकल्पाद्वारे ओढली असल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी यापैकी जवळपास सर्वच प्रकल्पांसाठी गेले वर्षभर आग्रह धरला होता. यंदाच्या म्हणजेच २०२२-२३ या आर्थिक वर्षांत खर्चासाठी तरतुदी प्रस्तावित करताना उत्पन्नातील अपेक्षित घट विचारात घेऊन जवळपास सर्वच खर्चात काटकसरीचे धोरण कायम ठेवण्यात आले असले, तरी काही वैशिष्टय़पूर्ण कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
गतवर्षी काटकसरीचा आणि वास्तवाकडे झुकणारा अर्थसंकल्प सादर करत महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे नेमके चित्र त्यांनी शिताफीने मांडण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र बिल्डरांच्या कृपेमुळे तिजोरीत उत्तम निधी जमा होताच आयुक्तांनी नवे प्रकल्प आणि घोषणांकडे आपला मोर्चा वळविला आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि नगरसेवक यामुळे कमालीचे सुखावले आहेत.
योजना पालकमंत्र्यांच्या, घोषणा आयुक्तांच्या
डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील बहुतांश घोषणा या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आग्रही मागण्यांतून आल्याचे दिसून येते. त्यामध्ये वागळे इस्टेट येथे नाटय़गृह उभारणे, आनंद दिघे यांचे स्मारक उभारणे, पार्किंग प्लाझा येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना, ठाणे शहरासाठी टाटा कर्करोग रुग्णालय चालू करण्याचे प्रयोजन अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.
लक्षवेधक
रस्ते सपाट करणार
रस्त्यांच्या पृष्ठीकरणासाठी पालिकेने २५० कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून ही कामे लवकर सुरू करण्यात येणार आहेत.
आरोग्यासाठी ३१७ कोटी
करोना उपचार केंद्राच्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार.
सोसायटय़ांना खतनिर्मितीसाठी टाक्या
१०० किलोपेक्षा कमी कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ा, चाळींत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी पालिका टाक्या पुरवणार.
१०० दशलक्ष अतिरिक्त पाणी
ठाणेकरांना यंदाच्या वर्षांत १०० दशलक्ष इतके वाढीव पाणी मिळेल असा दावा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. काळू धरणाचा प्रश्न शासन स्तरावर सुटण्याच्या मार्गावर असला तरी त्यापूर्वीच ठोस नियोजन करून वाढीव पाणी मिळेल असा प्रयत्न आहे. पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेचे पंप बसविण्याचे काम हाती घेतले आहे. येथील जुने ६०० अश्वशक्तीचे पंप बदलून ११५० अश्वशक्तीचे ५ पंप बसविण्यात येत आहेत. यामुळे ठाणे शहरास अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर इतकी प्रतिदिन पाणीपुरवठयात वाढ होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
करोना खर्चात कपात
पुढील आर्थिक वर्षांत कोविड उपाययोजनांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षी २२३ कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असून अवघे एक केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे, असे आयुक्तांनी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले.