होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात महापालिकेने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत २४ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. मुंब्रा आणि वागळे इस्टेट परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत २६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने ७५ मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, भांडी तसेच थर्माकॉल यासारख्या अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही या वस्तूंचा वापर होताना दिसून येतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांचा वापर करण्यात येतो. या पिशव्या ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या असतात. त्यामुळे अशा पिशव्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात पालिकेने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहिम हाती घेतली आहे.
ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार पथकाकडून ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत दिवा स्थानक परिसरात ५५ दुकानांमध्ये कारवाई करून पथकाने १५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. तसेच दुकानदारांकडून २१ हजारांचा दंड वसुल केला होता. त्याचप्रमाणे घोडबंदर येथील पातलीपाडा हिरानंदानी ईस्टेट भागातून २५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. त्यांच्याकडून २२ हजारांचा दंड वसूल केला होता. त्यापाठोपाठ मुंब्रा प्रभाग समिती समितीमध्ये ११ किलो प्लास्टीक जप्त करून एकूण १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर, वागळे प्रभाग समितीमध्ये एकूण १३ किलो प्लास्टीक जप्त करून १० हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय १० हजार रुपयांच्या दंडात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.