ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे वर्चस्व असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्याही कारभाराची चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामांची चौकशी सुरू असतानाच आता मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजप आमदार केळकर यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार, असा थेट सवाल केल्याने भाजप आणि शिंदे समर्थकांमधील विसंवादाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्या गळय़ात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. मात्र, ठाण्यात भाजप आणि शिंदे समर्थकांमध्ये फारसे सख्य दिसत नाही. शिंदे समर्थक माजी महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपमधील काही ठराविक नगरसेवकांशी जवळीक निर्माण करत त्यांच्याशी नियमित भेटीगाठी सुरू केल्या आहेत. परंतु भाजपच्या संघटनेत मात्र अजूनही शिंदे गटाविषयी फारसा जिव्हाळा नाही. मध्यंतरी कशिश पार्क परिसरात शिंदे समर्थक माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. भाजप आमदार केळकर हेदेखील वेळोवेळी पालिकेच्या कारभाराविषयी आक्रमक भूमिका घेऊन ठाणे महापालिकाही भ्रष्टाचाराने बरबटल्याचा आरोप करीत आहेत. केळकर यांच्या भूमिकेमुळे शिंदे समर्थक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची कोंडी होत असून त्यांना काय उत्तर द्यावे असा, प्रश्न त्यांच्यापुढे असल्याचे सांगण्यात येते.
कारवाई कधी?
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेऊन शहरातील विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली लिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. संबंधित अधिकारी आणि ठेकदारांनी केलेल्या अनियमिततेचे पुरावे देऊनही त्यावर काय कारवाई केली? असा प्रश्नही केळकर यांनी विचारला. मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई होते, मग ठाणे महापालिकेत अशी कारवाई, तपास, चौकशी का नाही, असा सवाल करत केळकर यांनी मुख्यमंत्री समर्थकांची कोंडी केल्याची चर्चा रंगली आहे.
आरोप काय?
शहरात कोटय़वधींची विकास कामे सुरू आहेत. अनेक कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा केली जात आहेत, असा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. त्याचे पुरावे त्यांनी १० जानेवारीला आयुक्त बांगर यांना दिले होते. त्यात स्मार्ट सिटीतील अनेक कामांसह कोपरी येथे एक कोटी खर्चून बनवलेला जॉगिंग ट्रॅक, पदपथांच्या कामात ठेकेदारांनी केलेली लूट आणि २६ तलावांची दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी १८६ कोटींची तरतूद या कामांचा समावेश आहे.
प्रकल्पांच्या कामांबाबत आमदार संजय केळकर यांचे काही समज-गैरसमज असतील तर ते प्रशासनाने दूर करावेत.
– नरेश म्हस्के, माजी महापौर, ठाणे आणि प्रवक्ते, बाळासाहेबांची शिवसेना
भू-माफियांमुळे शहर विद्रूप : केळकर
शहरात आजही बेकायदा बांधकामे सुरू आहेत. शहर स्मार्ट करण्यासाठी रंगरंगोटी केली जात आहे आणि भूमाफिया शहर विद्रुप करत आहेत. नागरिकांनी प्रत्येक वेळी कोर्टाची पायरी चढावी का? ठोस कारवाई करा अन्यथा, विधिमंडळात आवाज उठवण्यात येईल, लोकशाहीतील सर्व आयुधांचा वापर करण्यात येईल, असा इशारा आमदार केळकर यांनी दिला.