ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशसानाने ठाणेकरांना केले आहे.ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ५० दशलक्षलीटर वाढीव पाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यात पालिकेला यश आलेले नाही. त्यातच उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरात पाणी टंचाईची समस्येत आणखी वाढ होत असून यंदाच्या वर्षीही हेच चित्र कायम आहे.

सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पालिकेने ठाणेकरांना महत्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे आणि पाण्याची बचत करावी असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तर सोसायटीचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल

शक्यतो गाड्या धुवू नयेत, त्या ऐवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात. अंगणात शक्यतो पाणी मारु नये, नळ सुरू ठेवून कपडे धुणे, भांडी घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती दुरूस्त करावी. तसेच सोसायटीतील गळकी टाकी, पाईप, व्हॉल्व्ह दुरूस्त करावेत. इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होणार याची दक्षता घ्यावी, अन्यथा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा तसे आढळून आल्यास संबंधीत इमारतीचे किंवा सोसायटीचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल.

शक्यतो रोज आंघोळीसाठी शॉवर आणि बाथटबचा वापर करु नये. स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा. इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरु नये. पाण्याचा अनावश्यक साठा करु नये आणि साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती, सोसायटी, संकुलांमधील तरण तलावास पिण्याचे पाणी वापरु नये. वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत. कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे असे केल्यास पाण्याची बचत आणि मशीनचा पुर्ण क्षमतेने वापर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणारे निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे दोन दिवस फ्लश, बाथरुम धुणे, फरशी पुसणे, गाड्या धुणे व बगीचा आदीसाठी वापरावे, अशा सुचनाही पालिकेने केल्या आहेत.