लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून यामध्ये पालिका क्षेत्रात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मुर्तींच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असून या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. हाच नियम नवरात्रौत्सवाच्या काळातही लागू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मूर्तीकार किंवा साठवणूकदारांना शाडू माती किंवा पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणार किंवा साठवणार असल्याबाबतचे हमीपत्र पालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचबरोबर पालिकेने परवानगी दिलेल्या मूर्तीकार किंवा साठवूणकदाराकडून मूर्ती घेण्याचे आवाहन पालिकेने मंडळांना केले आहे.
पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. तसेच उच्च न्यायालयाने उत्सवांबाबत निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सवाकरिता एक मार्गदर्शक नियमावली तयार करून ती जाहीर केली आहे. यानुसार पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीना बंदी असेल. ठाणे महापालिका क्षेत्रात प्लास्टिक, थर्माकोल, पीओपीऐवजी नैसर्गिक, पर्यावरणपूरक जैव विघटक पदार्थापासून मुर्ती तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना मंडपाबाहेर ‘येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत’ अशा आशयाचा ३ X ५ एवढ्या आकारमानाचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात, रहिवासी संकुलातील टाकीमध्ये करणे किंवा मूर्ती स्विकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक असणार आहे.
मूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडप उभारण्याकरीता प्रभाग कार्यालयामार्फत परवानगी देण्यात येणार आहे. या परवानगीची प्रत मुर्तीकारांना मंडपात दर्शनी भागात प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्याची प्रभाग समिती पथकातर्फे पाहणी केली जाणार आहे. मूर्ती साठवणूकदारांनी किंवा विक्रेत्यांना देखील प्रभाग कार्यालयामार्फत परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. त्यांनाही या परवानगीची प्रत मंडपात दर्शनी भागात प्रसिद्ध करावी लागणार आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीने मूर्ती घडविणाकरिता लागणाऱ्या जागेसाठी अर्ज करण्याकरिता स्वतः मूर्तीकार असणे बंधनकारक आहे. तसे हमीपत्र त्यांना सादर करावे लागणार आहे. मूर्ती बनविण्याकरिता मोफत शाडू माती मिळविण्यासाठी इच्छुक मूर्तीकारांना पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर आलेले अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुर्तीकारांना निःशुल्क जागा मिळणार
पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्धतेनुसार महापालिकेची जागा प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना प्रभाग समिती कार्यालयाकडे ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. प्राप्त अर्जाची प्राधान्य क्रमानुसार छाननी करुन १५ एप्रिलपर्यंत महापालिका उपलब्धतेनुसार जागा उपलब्ध करुन देणार आहे. पालिकेतर्फे फक्त जागा देण्यात येणार आहे. तर, आवश्यक असलेली शेड, विद्युत व्यवस्था, पाणी व्यवस्था मूर्तीकारांना करावी लागणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेली जागा, नवरात्री उत्सव समाप्तीपर्यंतच्या मर्यादीत कालावधीसाठी म्हणजेच १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत देण्यात येणार आहेत. यानंतर ही जागा पुनःश्च महापालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे.
मंडळांना सूचना
रंगासाठी हळद, चंदन, गेरु यांचा वापर करावा. पुजेसाठी फुले, वस्त्र, इतर पूजा साहित्य पर्यावरणपुरक असावे. काच, धातूपासून बनविलेल्या ताट-वाट्यांचा वापर करावा. प्लेटसाठी केळी आणि इतर पानाच्या पत्रावळीचा वापर करावा. एकवेळ वापराचे प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक साहीत्य वापरू नये. मंडळांनी ठाणे महापालिकेकडून परवानगी घेऊन मूर्ती विर्सजनाचा आराखडा देऊन एक महिना पूर्व-परवानगी प्राप्त करावी.
पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि त्याचबरोबर उच्च न्यायालयाने वेळोवेली दिलेले निर्देश या सर्वाच्या आधारे पर्यावरणपुरक गणेशोत्सवाकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचे सर्वानी पालन करावे. -शंकर पाटोळे, उपायुक्त, ठाणे महापालिका