ठाणे : करोना काळापासून आर्थिक संकटांचा सामना करीत असलेल्या ठाणे महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या, शुक्रवारी आयुक्त सौरभ राव हे सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पालिकेची आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी कर दरवाढ लागू केली जाणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाणेकरांसाठी नव्या प्रकल्पांची घोषणा केली जाणार का की, जुनेच प्रकल्प पुर्ण करण्यावर भर दिला जाणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ५ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून पालिकेचा कारभार प्रशासकीय राजवटीखाली सुरू आहे. यामुळे २०२३ पासून म्हणजेच गेल्या दोन वर्षांपासून पालिका प्रशासन अर्थसंकल्प सादर करून त्याची अंमलबजावणी करीत आहे. करोना काळापासून पालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली असून ही घडी अद्यापही रुळावर आलेली नाही.
राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. याशिवाय, पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) या संस्थेशी पालिकेने प्राथमिक चर्चा केली होती. ही संस्था अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत महापालिकेस सहकार्य करणार आहे. एकूणच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या ठाणे महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी आयुक्त सौरभ राव हे सादर करणार आहेत.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात महसुली खर्च ३३४५ कोटी ६६ लाख, भांडवली खर्च १६७९ कोटी, अखेरची शिल्लक ३५ लाख असा एकूण ५०२५ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. उद्या सादर होणाऱ्या यंदाचा अर्थसंकल्प किती कोटींचा असणार आणि त्यात नव्या प्रकल्पांची घोषणा असणार की, जुनेच प्रकल्प पुर्ण करण्यावर भर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे महापालिकेची निवडणुक यंदाच्या वर्षात होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. यामुळे पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनही हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार आहे.