ठाणे : ‘माझ्या नजरेतून ठाणे’ या उपक्रमांतर्गत गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाच्याही अर्थसंकल्पात आखणीत नागरिकांच्या सुचनांचा समावेश करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार, अर्थसंकल्पाकरीता नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले असून यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातही नागरिकांच्या सुचनांना स्थान मिळण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळते. माध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून किंवा प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. यासोबतच नागरिकांची मते जाणून घेण्याची गरज असल्याने ‘माझ्या नजरेतून ठाणे’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांची शहराबद्दलची मते जाणून घेत त्याचा अर्थसंकल्पात अंर्तभाव केला होता. हा उपक्रम पुढे विद्यमान आयुक्त सौरभ राव यांनी पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. यासाठी आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच, शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. या आखणीत ठाणेकरांच्या सुचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पाकरीता नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन आयुक्त राव यांनी केले आहे. ज्या नागरिकांना सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाविषयी काही सूचना मांडायच्या असतील त्यांनी, शनिवार ८ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत आपल्या सूचना cafo@thanecity.gov.in या इमेल आयडीवर पाठवाव्यात. त्याशिवाय, मुख्य लेखा विभाग, दुसरा मजला, महापालिका मुख्यालय, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, ठाणे (प.) ४००६०२ या पत्त्यावर लेखी स्वरुपातही पाठवता येतील, अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी दिली आहे.