गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भुमिगत वाहनतळामुळे या मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय पक्षांनी महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात सुरुवात केली असतानाच या मैदानात नव्याने तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सुविधांची जंत्री मांडत हे मैदान केवळ ४४८ चौरस मीटर इतकेच कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. या मैदानात चालण्यासाठी सुसज्ज अशी वाट, विद्युत दिवे, संरक्षक भिंत अशा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच स्वच्छतागृह उभारले गेले असून संरक्षक भिंतीच्या उभारणीमुळे रात्री येथे लघुशंका करण्याच्या प्रकारांना आळा बसणार असल्याचा दावाही पालिकेकडून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाणे पोलिसांचे मध्यरात्री कोंबिग ऑपरेशन; १८४ जणांना अटक

ठाणे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गावदेवी मैदानात भुमिगत वाहनतळ उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाला सुरुवातीला विरोध झाला होता. हा वाद न्यायलयापर्यंत गेला होता. परंतु पालिकेने प्रकल्पाचे महत्व न्यायालयात सांगून त्यास न्यायालयाची परवानगी मिळली. या प्रकल्पाचे काम आता पुर्ण झाले असून या प्रकल्पाचे लोकार्पण लवकरच होण्याची शक्यता आहे. असे असतानाच या प्रकल्पामुळे जुन्या शहरातील एका मोठ्या मैदानाचा आकार कमी झाल्याची टिका केली जात आहे. भुमिगत वाहनतळावरील मैदान पुर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नाही, असा इशारा भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. त्यापाठोपाठ वाहनतळाची निर्मिती करताना मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी झाल्याच्या मुद्द्यावरून ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. महेश बेडेकर यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या मैदानाने आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, एस्. एम्. जोशी, यांसारख्या दिग्गजांच्या प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सभा अनुभवल्या असून अशा जुन्या आठवणींना उजाळा देत या मैदानाचा दिवसाढवळ्या मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा >>>कल्याण: सात तासाच्या अथक प्रयत्नानंतरही बिबट्याचा वनाधिकाऱ्यांना गुंगारा

प्रशासन म्हणते सुविधाही पहा

या मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी झाल्याच्या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच पालिका प्रशासनाने त्यावर स्पष्टीकरण देत काही दावे केले आहेत. गावदेवी मैदानाचे पुर्वीचे क्षेत्रफळ ५९८२ चौरसमीटर इतके होते. वाहनतळाच्या उभारणीनंतर मैदानाचे क्षेत्रफळ ५५३४ चौरसमीटर इतके झाले असून यामुळे मैदानाचे क्षेत्रफळ केवळ ४४८ चौरस मीटर इतकेच कमी झाले असल्याचा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केला आहे. हे मैदान पुर्वी उंच-सखल होते. आता ते एकसारखे करण्यात आले आहे. मैदानात चालण्यासाटी स्वतंत्र्य मार्ग, विद्युत दिवे, संरक्षक भिंत अशा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या मैदानात पुर्वी गर्दुल्यांचा वावर असायचा आणि त्याचबरोबर मैदानात लघुशंकाही केली जात होती. विद्युत दिवे, शौचालय आणि संरक्षक भिंतीच्या उभारणीमुळे रात्रीच्यावेळेस मैदानात लघुशंका करण्याच्या प्रकारांना आळा बसणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विद्युत दिवे आणि पथ-वे च्या उभारणीमुळे नागरिकांना सकाळ आणि सायंकाळी मैदानात फेरफटका मारणे शक्य होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation claims because of underground parking constructed gadevi ground the area has decreased from earlier amy