ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर ती तोडण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी काही दिवसांपुर्वी दिले होते. या आदेशानंतर बेकायदा बांधकामांवर फारशी कारवाई झालेली नसल्याचे चित्र असतानाच, आयुक्त राव यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. करोना काळानंतर बेकायदा बांधकामांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातील काही बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावरील सुनावणीदरम्यान, ठाणे आणि कल्याणमधील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी दिले होते. या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनाची धावपळ सुरू झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून रहिवाशांना इमारतीमधील सदनिका रिकाम्या करण्याची नोटीस बजावण्यात आल्या होत्या. अशाचप्रकारे ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी देताच, पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. यानंतर पालिकेचे पथक तिथे कारवाईसाठी गेले होते. परंतु नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेच्या पथकाला कारवाईविना माघारी फिरावे लागले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. तसेच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही बेकायदा बांधकामांबाबत महत्वाच्या सुचना केल्या होत्या.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रात ७६९ बेकायदा बांधकामे असून त्यापैकी ६६३ बांधकामांची नोंद प्रभाग समितींच्या बीट निरीक्षकांनी बीट नोंदवहीत केल्याचे सांगत ती तोडण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी नुकतेच दिले होते. तसेच या बांधकामांप्रकरणी त्यांनी सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यापाठोपाठ आता जमीन मालकासह बेकायदा इमारत उभारणाऱ्यांविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली होती. एकूणच बेकायदा बांधकामांवरील कारवाईला वेग येत असल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात मात्र फारशी कारवाई होताना दिसून येत नव्हती.

असे असतानाच, आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बैठकीत पुन्हा बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई करावी करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदा बांधकामांविषयी महापालिकेची भूमिका स्पष्ट असून राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीच्या आधारे सर्व सहाय्यक आयुक्तांनी बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे यांच्या विरोधात काटेकोर कारवाई करावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीतील प्रमुख मुद्द्यांची माहिती या बैठकीत दिली.

Story img Loader