पालिका सभागृहात वाजवण्यात येत असलेले राष्ट्रगीत अध्र्यातच थांबवल्याप्रकरणी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असतानाच, ठाणे महापालिकेतही राष्ट्रगीताचा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांना राष्ट्रगीत म्हणता येत नाही, असे कारण पुढे करीत पालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर केवळ राष्ट्रगीताची धून वाजवावी, असा ठराव महापालिकेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, असा या ठरावाचा हेतू असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या अनेक नगरसेवकांना ‘जन गण मन’ म्हणता येत नाही, हा मुद्दा गंभीर आहे.
राष्ट्रगीत हे प्रत्येक भारतीय नागरिकाला आलेच पाहिजे. मात्र ठाण्यातील नगरसेवक राष्ट्रगीत निरक्षर असल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ सुरू असतानाच विरोधी पक्षाने अचानकपणे राष्ट्रगीत सुरू केले होते. यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची टीका होऊ लागल्यामुळेच पालिका सभागृहात केवळ राष्ट्रगीताची धून वाजविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. ठाणे शहरातील महत्त्वाचे तसेच अन्य विकासकामांचे प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी येतात. या सभेत नियमानुसार सभा होण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ म्हटले जाते आणि सभेचा शेवट राष्ट्रगीताने केला जातो. असे असतानाच चार दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सभागृहात गोंधळाचे वातावरण होते. या गोंधळादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राष्ट्रगीत सुरू केले होते. त्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी तसेच प्रेक्षागॅलरीतील नागरिक आसनावर बसले होते. मात्र, राष्ट्रगीत ऐकून सर्व जण काही वेळाने उभे राहिले. यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची टीका होऊ लागली होती. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी शुक्रवारच्या सभेत राष्ट्रगीताचा मुद्दा उपस्थित केला.
सभागृहात सचिवांनी राष्ट्रगीत म्हटले पाहिजे आणि त्यापाठोपाठ लोकप्रतिनिधींनी, असा आग्रह त्यांनी या वेळी धरला. तसेच राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये यासाठी त्यांनी काही सूचना मांडल्या.
‘ते’ सुरात गात नाहीत!
पालिका सभागृहात राष्ट्रगीताची धून वाजवावी यासाठी ‘नगरसेवक ताला-सुरात गात नाहीत,’ असे कारण देण्यात आले आहे. ‘अनेक नगरसेवकांना राष्ट्रगीत म्हणता येत नाही आणि लय-सुरात ते गायले जात नाही,’ असा मुद्दा शिवसेनेचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी मांडला. असे प्रकार घडू नयेत आणि राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये म्हणून सभागृहात राष्ट्रगीताची धून वाजवण्याची सूचना त्यांनी मांडली. त्यास शिवसेनेचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक विकास रेपाळे यांनी अनुमोदन दिले. यामुळे महापौर संजय मोरे यांनी या प्रस्तावाची सूचना मान्य करीत त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.