ठाणे : टाकाऊ वस्तुंचा पुर्नवापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेने टाकाऊ वस्तुंपासून चार कलाकृती तयार केल्या आहेत. यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरु आणि सायकल टू सस्टेनिबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा जमा होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. सुका कचरा वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये टायर, लाकूड, धातू, सायकल टायर, रिंग, प्लास्टिक पाईप आणि ई कचऱ्याचा समावेश असतो. या कचऱ्याचा पुर्नवापर करणे गरजेचे असून याविषयीचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेने अनोखा उपक्रम राबविला आहे. या कचऱ्याचा पुर्नवापर करून पालिकेने आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत. त्यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेजर, तंत्र फुलपाखरु आणि सायकल टू सस्टेनिबिलिटी यांचा समावेश आहे. यापैकी या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत.
ठाणे बदलतंय
ठाणे बदलतंय ही १८० किलो वजनाची कलाकृती प्लास्टिक आणि ई-कचऱ्याचा वापर करून तयार करण्यात आली असून त्यासाठी प्लास्टिक आणि ई-कचरा वापरला आहे.
टायर टू ट्रेजर ही कलाकृती
पावसाळ्यात रिकाम्या टायरमध्ये पाणी साचून डेंगू- मलेरियाचे डास तयार होता. त्यामुळे अशा टायरचा आणि लाकडाचा पुर्नवापर करून १२० किलो वजनाचे टायर टू ट्रेजर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे.
तंत्र फुलपाखरु
कचऱ्यातील ई- कचरा, स्क्रॅप धातू, सायकल टायर रिंग यापासून १२० किलो वजनाचे तंत्र फुलपाखरु तयार करण्यात आले आहे.
सायकल टू सस्टेनिबिलिटी
हवा प्रदुषण रोखण्याचा संदेश देण्यासाठी सायकल टू सस्टेनिबिलिटी ही १०० किलोची कलाकृती सायकल, सायकल टायर, प्लास्टिक, पाइप यापासून बनविण्यात आली आहे. टाकाऊ वस्तुंचा पुर्नवापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी कचऱ्यातील टाकाऊ वस्तुंपासून चार कलाकृती तयार केल्या आहेत. या कलाकृतींमुळे शहराच्या सुशोभिकरणातही भर पडत आहे. डाॅ. राणी शिंदे घनकचरा व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका