ठाणे येथील सी पी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे गेल्या चार दिवसापासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू झाले असले तरी, ठाणे, घोडबंदर, नौपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्याने भरलेले डब्बे दिसून येत आहेत. याशिवाय, घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा समस्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिका टिकेची धनी ठरू लागली आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील सी पी तलाव भागात पालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिक हैराण असतानाच, गेल्या आठ दिवसांत याठिकाणी दोनदा आग लागली. या आगीच्या धुराचा त्रास झाल्याने स्थानिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला. यामुळे ठाण्यातील घरोघरी घंटागाडीमार्फत कचरा संकलन करण्याची प्रक्रीया ठप्प झाली होती. दरम्यान, ठाणे महापालिकेने सी पी तलाव येथील कचरा उचलून तो भिवंडीतील आतकोली येथील कचराभुमीवर नेण्यास सुरूवात केली आहे. हे काम २४ तास आणि तीन सत्रांमध्ये करण्यात येत असून दिवसाला सरासरी ९० वाहने हा कचरा नेत आहेत. आतापर्यंत १२ हजार मेट्रीक टन कचरा पालिकेने आतकोली येथील कचराभुमीवर नेण्यात आला आहे. दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणे, तसेच मातीचा थर देणे आधी शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू आहे. तसेच सी पी तलाव येथील कचऱ्याचे ढिग कमी होताच पालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसापासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू केले आहे. परंतु कचरा संकलन प्रक्रीयेची विस्कटलेली घडी अद्याप रुळावर आलेली नाही. यामुळे ठाणे, घोडबंदर, नौपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्याने भरलेले डब्बे दिसून येत आहेत. याशिवाय, घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, माजीवाडा, वर्तकनगर, नौपाडा, उथळसर या भागांमध्ये घरोघरी कचरा संकलनाचे तसेच रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचे काम ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात कचरा संकलनाचे काम सुरूच होते, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. गृहसंकुलांबाहेर तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून याचबरोबर नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यावरून पालिका प्रशासनावर टीका होऊ लागली आहे.

सी पी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रावरून आतापर्यंत १२ हजार मेट्रीक टन कचरा हटवून तो आतकोली येथे नेण्यात आला आहे. शहरात घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू करण्यात आले असून त्याचबरोबर रस्त्यावर साठलेला कचराही उचलण्यात येत आहे. शहरातील कचरा समस्या लवकरच सुटेल.-मनिष जोशी,उपायुक्त, ठाणे महापालिका