ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पावसाळ्याच्या कालावधीत धोकादायक वृक्ष उन्मळून पडण्याबरोबर वृक्षांच्या फांद्या पडून नागरिक जखमी होण्यासह वाहनांचे नुकसान होते. अशा दुर्घटना यंदाच्या पावसाळ्यात घडू नयेत यासाठी पावसाळ्याच्या दोन महिने आधीच शहरातील सहा हजार वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. धोकादायक फांद्यांची योग्यप्रकारे छाटणी केल्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याच्या प्रकारांनाही आळा बसेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
ठाणे महापालिका क्षेत्रात सात लाखाहून अधिक वृक्ष आहेत. पावसाळ्यात हे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार यापुर्वी समोर आला होता. याशिवाय, नागरिक जखमी होण्याबरोबरच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता असते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या दोन महिने आधीच वृक्ष छाटणीच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील वृक्षांची पाहाणी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून करण्यात आली होती. यानुसार, शहरातील रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बसथांबे आणि रहिवास परिसरात सहा हजार वृक्षांच्या फांद्या धोकादायक स्थिती असल्याचे आढळून आले असून या फांद्यांची पावसाळ्यापुर्वी छाटणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिक, लोकप्रतिनिधींना आवाहन
ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीनिहाय उद्यान विभागांच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून त्यांच्याकडे झाडांच्या फांद्या छाटणीची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, काही वेळेस काही धोकादायक वृक्ष पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नाहीत. परंतु स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना मात्र त्याबाबत माहिती असते. यामुळे या वृक्ष छाटणीच्या कामासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधीकडे काही तक्रारी आणि सुचना असतील, तर त्यांनी त्या पालिका प्रशासनाकडे कराव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दिडशे धोकादायक वृक्ष
ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान, दिडशे वृक्ष धोकादायक स्थितीत आढळून आली आहेत. कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून हे वृक्ष तोडण्यात येत आहेत. रस्त्यालगत असलेल्या वृक्षांभोवती काँक्रीटचे थर जमा झाले होते. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत होते. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर वृक्षांभोवती असलेले काँक्रीटचे थर काढून टाकण्यात आलेले आहेत, अशी माहीती उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील यांनी दिली.