ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या सर्वेक्षणामुळे मालमत्तांचा बांधकाम परवानगी तपशील, क्षेत्रफळ, वापर, इमारतीचा फोटो आणि मालमत्तेचा अंतर्गत नकाशा उपलब्ध होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. याशिवाय, गेल्या काही वर्षात ठाणे पालिका क्षेत्रात बेकायदा तसेच वाढीव बांधकामे करण्यात आली असून त्याची माहिती पालिकेला सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध होणार असल्याने मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ड्रोन तसेच तत्सम तंत्रज्ञान वापरुन जीआयएस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणा दरम्यान सर्व मालमत्तांचे जिओ सिक्वेसिंग (विशिष्ट पध्दतीने क्रमांक देणे) आणि जिओ रेफरन्सिंग (मालमत्तेचे लोकेशन नकाशावर नमूद करणे) करण्यात येणार आहे. तसेच सर्व मालमत्तांचे अंतर्गत मोजमाप देखील घेण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. पर्यावरणपूरक आणि दर्जेदार विकासांच्या कामांचे नियोजन करण्यासाठी, तसेच, धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी महापालिका क्षेत्राची भौगोलिक, सामाजिक आणि इतर अद्ययावत माहिती गोळा करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. या सर्वेक्षणा दरम्यान मालमत्तेची आणि नागरिकांची सुरक्षितता यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाबाबत नागरिकांना काही शंका असल्यास अथवा काही सूचना असल्यास त्यांनी dmctax@thanecity.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.

सर्वेक्षणाचा उपयोग

या सर्वेक्षणामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेच्या क्षेत्रफळाच्या अनुषंगाने मालमत्ता कराची आकारणी होत असल्याची खात्री करणे शक्य होणार आहे. मालमत्तेच्या दर्शनी भागावर क्युआर कोड असणारी पाटी बसविण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधाबाबत तसेच राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ई-प्रणालीतून नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने मालमत्ता कराच्या देयकावर बांधकाम परवानगी तपशील, क्षेत्रफळ, वापर, इमारतीचा फोटो व मालमत्तेचा अंतर्गत नकाशा उपलब्ध होणार आहे. मालमत्ता कराचे देयक ई-प्रणालीच्या माध्यमातून मालमत्ताधारांना उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा मानस आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

सर्वेक्षणासाठी अधिकृत प्रतिनिधी नेमणुक

ठाणे महापालिकेसाठी हे सर्वेक्षण मे. स्थापत्य कन्सल्टंट्स, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांचे अधिकृत प्रतिनिधी (गणवेश व ओळखपत्रासह) तंत्रज्ञानासह सर्वेक्षणासाठी सर्व मालमत्तांना भेट देणार आहेत. या प्रतिनिधींनी विनंती केलेली माहिती आणि संलग्न कागदपत्रे देऊन, तसेच मालमत्तेचे अंतर्गत मोजमाप घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात, शासनाच्या तसेच महापालिकेच्या विविध योजना त्याचप्रमाणे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित असताना ठाणेकरांचे योगदान आणि सहकार्य कायम लाभले आहे. त्याबद्दल ठाणेकरांचे आभार. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी, तसेच महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचे प्रभावी नियोजन करणायासाठी महापालिका प्रशासन सतत प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहे. त्यादृष्टीनेच हे मालमत्ता सर्वेक्षण करण्यात येत आहे. सौरभ राव आयुक्त, ठाणे महापालिका