ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील गृहसंकुलांना पाणी टंचाईच्या झळा बसत असून त्यावर मात करण्यासाठी पालिकेने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाढीव ५ दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा दररोज देण्याची मागणी ठाणे महापालिकेने स्टेम प्राधिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर स्टेम प्राधिकरण काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्येबाबत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका २०१६ मध्ये दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने घरगुती पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. या समितीची बैठक नुकतीच पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीस महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उप नगर अभियंता विकास ढोले, विधी अधिकारी मकरंद काळे, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी उपस्थित होते. तर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा कायदेविषयक सेवा प्राधिकरणाचे सचिव इश्वर सूर्यवंशी हे ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते.
हेही वाचा : राज्यमंत्री कपिल पाटील यांचा दिल्लीचा मार्ग यंदा खडतर ?
या बैठकीत, नागरिकांच्या एकूण १७ शिष्टमंडळांनी आपल्या तक्रारी आणि निवेदने सादर केली. त्यात मुंब्रा आणि ठाणे शहर येथील प्रत्येकी ०१ तर, घोडबंदर रोड परिसरातील १५ शिष्टमंडळांचा समावेश होता. यामध्ये वाघबीळ, विजयनगरी, हावरे सिटी, लोढा-भाईंदरपाडा, ओवळा नाका या भागातील सर्वाधिक तक्रारींचा समावेश होता. घोडबंदर भागातील गृहसंकुलांना टंचाईच्या झळा बसत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी समितीपुढे केल्या. पालिकेची पाणी देयके भरूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असून यामुळे टँकर खर्चाचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यानिमित्ताने घोडबंदरमधील पाणी टंचाईचे वास्तव समोर आले होते. या तक्रारींची दखल घेऊन पाणी वितरण व्यवस्थेबाबत दीर्घकालीन उपाययोजनासाठी ठाणे महापालिका प्रयत्न करत असल्याचे सांगत तत्काळ दिलासा मिळावा यासाठी ५ दशलक्षलिटर वाढीव पाणी देण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने आता वाढीव पाण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी वाढीव ५ दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा दररोज देण्याची मागणी ठाणे महापालिकेने स्टेम प्राधिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा : उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलिटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलिटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु असे असले तरी आजही ठाण्यातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात घोडबंदर भागाला तर याची झळ अधिक बसत आहे.