ठाणे महापालिका क्षेत्रातील विशेषत: कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात उभे राहत असलेल्या बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून टिकेचे धनी ठरलेल्या प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. कळवा येथील सह्याद्री सोसायटी आणि घड्याळ चौकातील दोन इमारतींवर पालिका प्रशासनाने कारवाई केली असून यापुढेही ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवलीत भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून भुमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सूरू आहेत. यामध्ये कळवा, मुंब्रा, दिवा आणि शिळडायघर भागातील इमारती सर्वाधिक आहेत. दोन महिन्यात आठ मजली इमारती उभारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात नुकतेच आरोपही केले होते. या बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर सातत्याने टिका होत आहे. अशी बांधकामे रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून अशा इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा करू नये, असे आदेश त्यांनी नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर हि बांधकामे पाडण्यासाठी पालिकेकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत कळवा येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी विटाव्यात नव्याने उभ्या राहत असलेल्या दोन इमारतींचे बांधकाम तोडण्यात आले. विटावा पऱ्याचे मैदान आणि विर्सजन घाट येथे ही अतिक्रमणे उभी राहत होती. यात एका चार मजली इमारतीचा समावेश होता. ती जमीनदोस्त करण्यात आली. कळव्यातील सह्याद्री सोसायटी जवळील तळ अधिक दोन मजल्याच्या इमारतीवर कारवाई करण्यात आली. तसेच घड्याळ चौकातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीवर कारवाई करण्यात आली. कळवा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे ठाणेकर यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation demolished illegal construction in kalwa zws
Show comments