ठाणे : मालमत्ता तसेच पाणी देयकांच्या वसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी देताच, गुरूवारी नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद देत नसलेल्या दहा लाखांंपेक्षा अधिकचा कर थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या आस्थापनेसमोर ढोल ताशे वाजविले. या प्रकारानंतर काही मालमत्ताधारकांनी धनादेश दिले तर काहींनी कर भरण्यासाठी मुदत मागितली.
हेही वाचा : ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ झाली असली तरी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अडीच महिनेच शिल्लक राहिले आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट ८५७ कोटी रुपये असून आतापर्यंत ५७६ कोटींची वसुली झाली आहे. तर, पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य २२५ कोटी रुपये असून त्यापैकी ८० कोटींची वसुली झालेली आहे. यामुळे उर्वरित कर वसुलीसाठी आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत. मालमत्ता कर आणि पाणी देयकातून येणारा महसुल हा महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वसुलीची उद्दिष्ट पूर्ती तातडीने व्हावी, असे आयुक्त राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षीची रक्कम आणि थकबाकी वसुल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करावा. आवश्यक तेथे जप्ती, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाईही करण्यात यावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले होते. ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील दहा लाखांपेक्षा अधिक कर थकविणाऱ्यांची यादी तयार केली आहे. वारंवार आवाहन करूनही थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांच्याकडून कर वसुली करण्यासाठी पाटोळे यांनी अनोखी पद्धत अवलंबली. या थकबाकीदारांच्या आस्थापनेजवळ जाऊन ढोल ताशे वाजवत मालमत्ता कर भरण्यास सांगितले. या प्रकारामुळे काहींनी थकीत कराचे धनादेश दिले तर काहींनी कर भरण्यासाठी मुदत मागितली.
आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानंतर दहा लाखांंपेक्षा अधिकचा कर थकविणाऱ्या ३५ थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या सर्वांना वारंवार आवाहन करून ते प्रतिसाद देत नसल्यामुळे ढोल-ताशे वाजवून अनोख्या पद्धतीने कर वसुली करण्यात येत आहे. या कारवाईनंतर अनेकांनी कराची रक्कम भरण्यास सुरूवात केली आहे.
शंकर पाटोळे (उपायुक्त, ठाणे महापालिका)