ठाणे : दिवा येथील बेतवडे परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून परवडणारी घरे उभारणीसाठी पालिका प्रशासनाने दोनदा निविदा काढूनही त्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. यामुळे पालिका प्रशासनाने आता निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करत नव्याने पुन्हा निविदा काढली आहे. यापुर्वीच्या निविदेतील पंतप्रधान आवास योजनेतून घरांची उभारणी करण्याचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारांनाच निवड करण्याची अट कायम ठेवत त्याचसोबत शासनाच्या बांधकाम क्षेत्रातील उर्जा प्रकल्प, दुरसंचार, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, औद्योगिक वसाहत, लाॅजिस्टिक पार्क, जलवाहिनी, सिंचन, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, महामार्ग आणि पुल अशा कामांचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारांची निवड केली जाणार आहे. त्यास ठेकेदारा किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवा येथील बेतवडे परिसरातील दोन भुखंडावर पंतप्रधान आवास योजनेतून परवडणाऱ्या घरांची उभारणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी घेतला. हा प्रकल्प खासगी लोकसहभाग (पीपीपी) या तत्वावर राबविण्यात येणार असून या प्रकल्पात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १ हजार ४४४१ घरांची उभारणी केली जाणार आहे. त्यापैकी त्यापैकी १ हजार २५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. तर, उर्वरित १८८ नागरिक प्रकल्पबाधित असून त्यांना सदनिकेसाठी दोन लाख रुपये भरावे लागणार आहेत. या सदनिका ३० चौरस मीटर चटई क्षेत्राच्या असणार आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी पालिका प्रशासनाने सल्लागार कंपनीची नेमणुक करून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला होता. या आराखड्यानुसार पालिका प्रशासनाने निविदा काढली होती. या निविदेनुसार, पाच वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसह एक हजार ४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका स्वखर्चाने महापालिकेस बांधून देईल अशा विकसकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विकासकाला व्यावसायिक विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी या प्रकल्पाच्या कामासाठी दोनदा निविदा काढूनही त्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. निविदेतील काही अटी व शर्तींमुळे ठेकेदारा निविदेकडे पाठ फिरवत असल्यामुळे पालिका प्रशासनाने निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पालिकेने आता अटी व शर्ती बदलून नव्याने निविदा काढली आहे. त्यास ठेकेदार प्रतिसाद देणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

हेही वाचा : डोंबिवलीतील बेकायदा राधाईच्या जमीन मालकांच्या जिवाला गुंडांपासून धोका, ठाणे पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी

प्रतिसाद का मिळत नव्हता

विकासकाने सव्वा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे यापूर्वी काम केले असावे अशी एक अट निविदेत होती. शासकीय योजनेत घरांची उभारणी करण्याचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारांनाच या प्रकल्पाच्या निविदेत सहभागी होता येईल, अशी अट होती. यामुळेच निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात होते. तसेच ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा भागात बेतवडे परिसर येतो. त्याठिकाणी अद्यापही फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे येथे विकासक विक्रीसाठी ज्या सदनिकांची उभारणी करेल, त्याची विक्री होईल का आणि शहराप्रमाणे त्याला येथे दर मिळेल का? अशी शंका उपस्थित होत होती. यामुळेच विकासक पुढे येत नव्हते.

हेही वाचा : ‘माधव’ इमारत तोडल्याने कल्याण मलंगरोड, उल्हासनगर रस्त्यामधील अडथळा दूर

अटी व शर्तीमध्ये बदल

यापुर्वीच्या निविदेतील पंतप्रधान आवास योजनेतून घरांची उभारणी करण्याचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारांनाच निवड करण्याची अट होती. ही अट कायम ठेवण्यात आली असून त्याचबरोबर शासनाच्या बांधकाम क्षेत्रातील उर्जा प्रकल्प, दुरसंचार, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, औद्योगिक वसाहत, लाॅजिस्टिक पार्क, जलवाहिनी, सिंचन, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, महामार्ग आणि पुल अशा कामांचा अनुभव असणाऱ्या ठेकेदारांची निवड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे निविदेतील अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation did not get contractor for pm awas yojana css