लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी देयके थकविणाऱ्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाईस सुरूवात केली आहे. डिसेंबर महिन्यात महापालिका क्षेत्रात २ हजार ६०६ नळ जोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ७३ पंप रुम सील करण्यात आले आहेत. २ हजार ३३० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा ही शहरे येतात. महापालिकेची पाणी पुरवठा देयकांची रक्कम सुमारे २२५ कोटी रुपये आहे. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची देयक रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी देयकाची थकबाकी भरणे टाळणाऱ्यांची नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात महापालिका क्षेत्रात २ हजार ६०६ नळ जोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ७३ पंप रुम सील करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-ठाणे शहरात वर्षभरात आगीच्या ८०८ घटना
पाणी देयकाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी देयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर कक्ष सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. विभागाने एप्रिल ते डिसेंबर या काळात ७७.९८ कोटी रुपयांची देयक वसुली केली. तर पाणी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात २१.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी देयक वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच, पाणी देयक वसुलीत हयगय करणारे कनिष्ठ अभियंता आणि मीटर तपासणीस यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी वेळेत पाणी पुरवठ्याची देयके भरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी केले आहे.
आणखी वाचा-परवानग्यांशिवाय २७०० कोटींचे कंत्राट, ठाणे खाडी किनारामार्गाचे गौडबंगाल; निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह
देयक वसूली ( एप्रिल ते डिसेंबर)
माजिवडा मानपाडा : १४,८६,४८,१४८
नौपाडा – कोपरी : १०,२१,८९,३८९
वर्तकनगर : ७,७५,१४,७९०
उथळसर : ६,५२,६०,८३५
कळवा : ०८,०८,१०,७६५
वागळे : ४,०६,२२,५७०
लोकमान्य- सावरकर : ०५,९५,२०,९०५
मुंब्रा : ६,४७,३२,७७९
दिवा : ०६,८४,२७,५१४
मुख्यालय-सीएफसी : ०७,२०,२८,५८५
एकूण : ७७,९७,५६,२८०