ठाणे : ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रशासनाकडून वाचन कोपरा, विज्ञान मंच, आर्दश शाळा यासारखे उपक्रम राबविले जात असून त्यापाठोपाठ आता शाळेतील शिक्षकांनाही सिंघानिया शैक्षणिक संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याची योजना प्रशासनाने आखली असून त्यास सिंघानिया शैक्षणिक संस्थेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याशिवाय, व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून २५ शाळांमध्ये पायाभुत सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेच्या प्राथमिक १०३ आणि माध्यमिक २३ अशा एकूण १२६ शाळा आहेत. या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालये व्यवस्था, शाळांची दुरुस्ती अशा पायाभुत सोयीसुविधा पुरविण्यावर पालिकेने लक्ष केंद्रीत केले होते. त्याचाच एक भाग म्हणून ६२ शाळा आर्दश शाळा (माॅडेल स्कुल) करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्यासाठी शासनाने यापुर्वी ५० कोटींचा निधी मंजुर केला आहे. हा निधीही पालिकेला प्राप्त झालेला असून त्याअंतर्गत आर्दश शाळांचे काम सुरू आहे.
तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. विज्ञान मंच उपक्रमांतर्गत पथनाट्य स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, नेहरू सायन्स सेंटर आणि नेहरू तारांगण येथे ५०० विद्यार्थांना शैक्षणिक भेट, खोडद येथे ४० विद्यार्थ्यांना जंगलातील सर्वात मोठी दुर्बिण सफर सहल आयोजित करण्यात आली होती. चला वाचू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या वयानुरूप आणि अपेक्षित विषयानुरुप पुस्तकांचा शाळेत एक वाचन कोपरा तयार करण्यात आलेला आहे.
विद्यमान आयुक्त सौरभ राव यांनी ही परंपरा कायम ठेवत मुलींना कराटे प्रशिक्षण, कल चाचणी, प्रथोमपचार कक्ष, मुलींच्या सुरक्षिततेसाठी अलार्म उपक्रम, पारंपारिक खेळांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठीही उपक्रम आखण्यात आलेले आहेत.
चौकट
ठाणे महापालिकेच्या शाळांचा भौतिक आणि गुणवत्ता दर्जा वाढविण्यासाठी पालिका शाळेतील शिक्षकांची निवड करण्यात येणार असून या शिक्षकांना दिल्लीतील शासकीय शाळा कशा चालविण्यात येतात, याची माहिती घेण्यासाठी शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय, खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळेतील विद्यार्थांना शिक्षकांकडून शिक्षण मिळावे आणि खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना शिक्षण विभागाने आखली आहे.
यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील सिंघानिया शैक्षणिक संस्थेसोबत चर्चा केली असून त्यांनीही शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविला आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांनी दुजोरा देत त्याचबरोबर व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून २५ शाळांमध्ये पायाभुत सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.