ठाणे : ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज आठ लाख लीटर पाणी लागणार असून या पाण्याचा पुरवठा नागलाबंदर आणि कोलशेत भागातील मल-जलशुद्धीकरण केंद्रातून करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलवाहिनीद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या पाण्याच्या पुरवठ्यासाठी पैसे आकारण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याने यातून पालिकेला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे ते बोरिवली या प्रवासासाठी नागरिकांना घोडबंदरहून मिरारोड मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे कोंडीची समस्या निर्माण होते. या कोंडीतून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे हाल होतात. या प्रवासात त्यांचा वेळ आणि इधनही वाया जाते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाकडून ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रकल्पाचे काम करण्यात येत असून या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर १२ मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. घोडबंदर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून हा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले.

हेही वाचा…अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर

या प्रकल्पाचे कामासाठी दररोज आठ लाख लीटर इतके पाणी लागणार आहे. या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी एमएमआरडीएने ठाणे महापालिककडे केली होती. हा पाणी पुरवठा कसा करायचा यावर गेले काही दिवस विचार सुरू होता. दरम्यान, मल-जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत झाला आहे. या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ८० हून अधिक टँकर लागू शकतात. या टँकरच्या वाहतूकीमुळे कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचबरोबर टँकर वाहतूकीचा खर्चाचा भारही पडेल. तसेच इतक्या टँकरची व्यवस्था करणेही शक्य नाही. त्यामुळेच जलवाहीनीद्वारेच पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून त्यासाठी नागलाबंदर आणि कोलशेत भागातील मल-जलशुद्धीकरण केंद्राची ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहाणी केली आहे.

जलवाहीनीचा भविष्यात उपयोग

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी बोरिवडे मैदान येथे दररोज पाच लाख लीटर तर, मुल्लाबाग येथे दररोज ३ लाख लीटर इतके पाणी लागणार आहे. बोरिवडे मैदान येथे नागलाबंदर येथून तर, मुल्लाबाग येथे कोलशेत येथून जलवाहीनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असून हे अंतर दोन ते तीन किमी इतके आहे. काम संपल्यानंतर या जलवाहीनीद्वारे उद्यान, रस्ते धुलाई कामाकरीता पाणी पुरवठा करणे शक्य होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

पाणी पुरवठ्यातून मिळणार उत्पन्न ?

ठाणे महापालिकेचे एकूण आठ मलजलशुद्धीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये कोपरी, नागलाबंदर, कोलशेत, माजीवाडा, हिरानंदानी इस्टेट, विटावा, मुंब्रा आणि खारेगाव या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रातील पाणी उद्यानांसाठी किंवा रस्ते धुलाईसाठी वापरले जाते. उर्वरित पाणी खाडीत सोडले जाते. आता या प्रक्रीया केलेल्या पाण्यातून पालिकेला उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. या पाण्याच्या पुरवठ्यासाठी पैसे आकारण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असून हे दर किती असावेत यावरही चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation eight lakh liters of water daily for thane borivali subway supplied from naglabandar and kolshet area water treatment plant sud 02