निलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपखाडी भागातील सेनेच्या नाराज शिलेदारांना हेरून त्यांना पक्ष प्रवेशासाठी भाजपाकडून गळ घातली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याशिवाय प्रभागात प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपाकडून संपर्क साधला जात असल्याचेही वृत्त आहे. यानिमित्ताने ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नेत्यांनी शहरात मिशन कमळ राबविण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली असून त्यासाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नाराज शिलेदारांवर भाजपाचा डोळा असल्याचे सूत्रांकडून समजते.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण प्रक्रिया नुकतीच उरकण्यात आली असून पावसाळ्यानंतर पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छूक उमेदवार कामाला लागल्याचे चित्र आहे. असेच काहीसे चित्र काही महिन्यांपूर्वी शहरात होते. निवडणूक जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाच्या नेत्यांनी शहरात मिशन कमळ राबविण्यास सुरुवात केल्याचे चित्र होते. यात विद्यमान नगरसेवकाप्रमाणेच प्रभागात मताधिक्य घेऊ शकेल, अशा दुसऱ्या फळीतील नाराज शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना हेरून भाजप त्यांना पक्षप्रवेश देत होती. अशाचप्रकारे किसननगर आणि वर्तकनगर भागातील शाखाप्रमुखांना पक्षप्रवेश देऊन भाजपाने सेनेला धक्का दिला होता. त्यानंतर दिव्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी निलेश पाटील आणि आदेश भगत यांना शिवसेनेने पक्ष प्रवेश देऊन भाजपला प्रतिउत्तर दिले होते. परंतु निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे समजताच पक्षप्रवेशाची मालिका थंडावली होती. आता पावसाळ्यानंतर निवडणूका होणार असल्याचे बोलले जात असून यामुळे भाजपने पुन्हा कमळ मिशन राबविण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.

वागळे इस्टेट परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच हाच परिसर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघात येतो.याच भागातून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. यामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आता याच भागावर लक्ष केंद्रित केल्याचे सूत्रांकडून समजते. नाराज असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना भाजपचे स्थानिक वरीष्ठ नेते फोनवरून संपर्क साधत असून त्यामध्ये ते त्यांना पक्ष प्रवेशासाठी गळ घालत आहेत. राष्ट्रवादीतुन भाजपात आलेल्या काही नेत्यांनी वागळे परिसरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधल्याची चर्चा आहे.

“पूर्वी शिवसेना आणि भाजपा युती होती. त्यावेळेपासून सेनेतील अनेकांशी आमची ओळख आहे. यातील काही नाराज आम्हाला संपर्क साधत असून त्यांना पक्ष प्रवेश देण्याची बोलणी सुरू आहे,” अशी माहिती भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation election bjp trying to contact unhappy shivsainiks to join party in thane sgy
Show comments