ठाणे : ठाणे महापालिकेतील मान्यता प्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. याच सभेत ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची थकबाकीसह इतर देणीची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली तर, प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेतील मान्यता प्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा शनिवारी युनियन कार्यालयातील स्व. अण्णा साने सभागृहात पार पडली. या सभेत युनियन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून यात कामगार नेते, युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदी कामगार नेते मोहन तिवारी, उपाध्यक्ष पदी बिरपाल भाल, सरचिटणीस पदी चेतन आंबोणकर, सहाय्यक सरचिटणीस पदी आनंदा पावणे आणि कोषाध्यक्ष पदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकत्यांची चिटणीस, सहाय्यक चिटणीस आणि कार्यकारिणी सदस्य पदावर निवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक अशोक वैती, पवन कदम, ऍड .रविंद्रन नायर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी लागू करून घेतली, वाहतूक भत्ता लागू करून घेतला. तसेच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, वाहतूक भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन लागू करणे, त्यांच्या ग्रॅच्यूएटी, पीएफची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत. परंतु प्रशासनाने टाळाटाळ केल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला. सफाई कामगारांच्या वारसाची लढाई महाराष्ट्र महानगरपालिका नगरपालिका संघटना फेडरेशनच्या माध्यमातून आपण जिंकली प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सफाई कामगारांच्या वारसांना लवकरात लवकर सेवेत घेण्याचा निर्धार बिरपाल भाल यांनी व्यक्त केला. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता लवकरात लवकर अदा झाला नाहीतर महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कामगार-कर्मचाऱ्यांच्या भरघोस पाठिंब्यामुळे आपण सातव्या वेतन आयोवर आधारित वेतन श्रेणी मिळवली. आता केंद्र शासनाने आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली आहे. यापुढे आपल्याला आठव्या वेतन आयोगाची लढाई लढावी लागेल. त्यासाठी कामगार-कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आपली एकजुट कायम ठेवावी, असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस चेतन आंबोणकर यांनी केले.