ठाणे : ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात विविध विभागांना ठरवून दिलेल्या उद्दीष्टातून एकूण २ हजार ६२ कोटीचा कर मिळणे अपेक्षित असून त्यापैकी १ हजार १३८ कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झालेला आहे. करवसुलीची टक्केवारी ५५ टक्के इतकी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात उर्वरित ९२४ कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका प्रशासानाने यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिलेले आहे. या करवसुलीतून २ हजार ६२ कोटी ४१ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला ८५७ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. यामुळे नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाला होता. निवडणुक संपताच ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम डिसेंबर महिनाअखेर दिसून आले होते. कर वसुलीत वाढ होत असल्याचे चित्र होते. असे असले तरी पालिकेला डिसेंबर महिनाअखरे जेमतेम ५५ टक्के इतकीच करवसुली करणे शक्य झालेले आहे.

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला ८९३ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले असून त्यापैकी ५६३ कोटींची म्हणजेच ६३ टक्के करवसुली डिसेंबर महिना अखेरपर्यंत झाली आहे. पाणी पुरवठा विभागाला २३५ कोटी ५२ लाखांचे उद्दीष्ट असून त्यापैकी ७४ कोटी ६७ लाखांची म्हणजेच ३१ टक्के इतकीच कर वसुली झाली आहे. जाहीरात विभाग ९ कोटी ५२ लाख, स्थावर मालमत्ता ५ कोटी १४ लाख, घनकचरा ५३ लाख, नाट्यगृह १ कोटी ८२ लाख, अग्निशमन विभाग ५६ कोटी २९ लाख, अतिक्रमण विभाग २ कोटी ३४ लाख अशी करवसुली झाली आहे. शहर विकास विभागाला ७५० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३८७ कोटींची वसुली झाली आहे. विविध विभागांच्या कर वसुलीतून एकूण २ हजार ६२ कोटीचा कर मिळणे अपेक्षित असून त्यापैकी १ हजार १३८ कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झालेला आहे. पुढील दोन महिन्यात उर्वरित ९२४ कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.

विभाग मुळ अंदाज वसुलीतीन महिन्यात अपेक्षित उत्पन्न
मालमत्ता कर ८९३.०४ (कोटी)५६३.२७ ( कोटी )३२९.७७ ( कोटी )
शहर विकास विभाग ७५० ३८७.३६ ३६२.६४
पाणी पुरवठा २३५.५२ ६४.६७ १६०.८५
जाहीरात विभाग२४.६२ ९.५२ १५.१०
सार्वजनिक बांधकाम ४०.६० ८.७५ ३१.८५
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation expects 2062 crores in taxes with 1138 crores collected so far sud 02