ठाणे : शहरात नालेसफाईची कामे योग्यप्रकारे झाली नसल्याच्या मुद्द्यावरून टिकेचे धनी ठरलेल्या महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. नालेसफाईच्या एका ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई प्रशासनाने काही दिवसांपुर्वी केली असून त्यापाठोपाठ ठरवून दिलेल्या वेळेत कामे पुर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी आणि उथळसर भागातील ठेकेदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. या ठेकेदारांना ८ लाख ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे नालेसफाईत कुचराई करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा >>> नोकरीला लावण्याच्या आमीषाने कल्याणमध्ये वकिलाकडून सहा लाखाची फसवणूक
पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी नालेसफाईची कामे करते. यंदाही पालिकेने पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे हाती घेतली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उशीराने नालेसफाईची कामे सुरू झाली. तसेच नालेसफाई करणाऱ्या कामगारांना सुरक्षासाधने पुरविण्यात येत नसल्याची बाब समोर आली होती. यावरून पालिकेच्या कारभारावर टिका झाली होती. भाजपचे आमदार संजय केळकर आणि भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शहराचा पाहाणी दौरा करून नालेसफाईची कामांची पोलखोल केली होती. अनेक नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढिग दिसून आल्याने केळकर यांनी प्रशासनावर टिकेचे आसुड ओढले होते.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमी जलमय; पार्थिव नेताना नागरिकांचे हाल
कळवा आणि मुंब्य्रात नालेसफाईच झाली नसल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्याचे पुरावे म्हणून छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. यानंतर पालिकेने या भागातील नालेसफाईच्या कामांना सुरूवात केली असून अनेक नाल्यांची सफाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही नालेसफाईच्या कामांची पाहाणी करून उथळसर भागातील नालेसफाईच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. नालेसफाईची कामे असमाधानकारक केल्याप्रकरणी मे. जे.एफ. इन्फ्राटेक या कंपनीच्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई बांगर यांनी केली होती. त्यापाठोपाठ आता ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ३१ मे पर्यंत नाले सफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले होते. या वेळेत कामे पूर्ण झाली नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार या मुदतीत काम पुर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या ठेकेदारांना पालिकेने नोटीसा बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी दिली.