ठाणे : महापालिकेने ग्रामस्थांना दिलेल्या लेखी आश्वासनानुसार ठाणे महापालिकेने भंडार्ली कचरा प्रकल्प अखेर गुरूवारपासून बंद केला असून या प्रकल्पात येणारा कचरा आता डायघर कचरा प्रकल्पात पुर्ण क्षमतेने पाठविण्यास सुरूवात झाली आहे. याठिकाणी कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करून खत निर्मिती करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांत येथे कचऱ्यापासून बायो गॅस आणि वीज निर्मीतीचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने १४ वर्षानंतर ठाणे पालिकेचे हक्काचे कचरा प्रक्रीया केंद्र कार्यान्वित झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. याठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नव्हती. कचरा दुर्गंधी आणि आगीमुळे परिसरात धुर पसरत होता. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे नागरिकांनी कचरा प्रकल्पास विरोध केला होता. यानंतर पालिकेने दिवा कचरा भुमी बंद करून पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात कचरा प्रकल्प उभारला होता. वर्षभरासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला असला तरी दिड वर्षे होऊनही तो सुरूच होता.
या प्रकल्पामुळे शेतीचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे नागरिकांनी हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलनेही केली होती. स्थानिकांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली होती. त्यावेळेस २५ ऑक्टोबरपर्यंत हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आयुक्त बांगर यांनी ग्रामस्थांना दिले होते. आश्वासनानुसार ठाणे महापालिकेने भंडार्ली कचरा प्रकल्प अखेर गुरूवारपासून बंद केला असून या प्रकल्पात येणारा कचरा आता डायघर कचरा प्रकल्पात पुर्ण क्षमतेने पाठविण्यास सुरूवात झाली आहे.
हेही वाचा : स्वच्छ स्थानकाचा पुरस्कार मिळालेल्या ठाणे स्थानकात अस्वच्छता
१४ वर्षांनंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू
डायघर येथे कचरा प्रकल्प उभारणीसाठी पालिकेकडून गेल्या १४ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे आणि काही तांत्रिक कारणास्तव हा प्रकल्प सुरू होऊ शकला नव्हता. शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी डायघर येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी पालिकेच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. या प्रकल्पास तेथील स्थानिकांनी विरोध सुरू केल्याने महापालिकेसमोर कचरा पेच निर्माण झाला होता. माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह डायघर भागातील स्थानिकांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर डायघर घनकचरा प्रकल्प कशाप्रकारे राबविला जाणार आणि त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही, याचे प्रात्यक्षिक घनकचरा विभागाने स्थानिकांना दाखविले. यानंतर या प्रकल्पात प्रायोगिक तत्वावर १५ टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने याठिकाणी कचरा आणण्यास सूरूवात झाली असून गुरूवारी याठिकाणी पुर्ण क्षमतेने कचरा आणून त्यावर प्रक्रीया करण्यात आली.