ठाणे: मराठी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उभारी मिळावी या उद्देशातून ठाणे महापालिकेने मराठी भाषेतील कार्यक्रमांसाठी राम गणेश गडकरी रंगायतन आणि डाॅ, काशीनाथ घाणेकर या दोन्ही नाट्यगृहातील भाडे दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाडे दरात निम्म्यापेक्षा जास्त कमी झाल्याने नाट्य तसेच विविध संस्थांना नव्या वर्षात भाडे कपातीचा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील नाट्यगृहांच्या तुलनेत भाडेदर जास्त असल्यामुळे ठाणे महापालिकेने ही भाडेदर कपातीचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही सवलत घेऊन इतर कार्यक्रम केले तर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. तर, नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृहे सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत. गडकरी रंगायतन नाट्यगृहाची आसन क्षमता १०५६ इतकी आहे. घाणेकर नाट्यगृहाची १०९५ तर, येथील लघु सभागृहाची क्षमता १८२ इतकी आहे. या नाट्यगृहांमध्ये शनिवारी आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पाच हजारांच्या आसपास प्रेक्षक येतात. या दोन्ही नाट्यगृहातील भाडे दर मुंबई आणि नवी मुंबई महापालिका नाट्यगृहाच्या तुलनेत दुप्पट आहे. रविवारच्या दिवशी हे भाडे अधिक असते.

हेही वाचा… ‘बाबा’च्या आदरांजलीसाठी रेव्ह पार्टीचे आयोजन

रविवारच्या दिवशी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहाचे भाडे वस्तु व सेवा करासहित ९ हजार ५०० रुपये इतके असते. याच दिवशी ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचे भाडे वस्तु व सेवा करासहित ३७ हजार ५०० रुपये तर, गडकरी रंगायतनचे भाडे वस्तु व सेवा करासहित २६ हजार ४०० इतके असते. हे भाडे दर कमी करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ या संस्थांनी काही महिन्यांपुर्वी केली होती. ही मागणी मान्य करत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी भाडे दरात निम्म्यापेक्षा जास्त कपात केली आहे. सर्व संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पंक्षाचे कार्यक्रम, शाळा महाविद्यालयीन कार्यक्रम विना तिकीट असतील तर त्यांना १२ हजार ५०० भाडे भरावे लागणार असून हे दर पुर्वी इतकेच आहेत.

अशी आहे दर कपात

स्वनिर्मित नाट्यप्रयोग, एकांकिका या कार्यक्रमांसाठी ३००रुपये तिकीट दर असेल तर त्यासाठी यापुर्वी सोमवार ते शुक्रवार २६ हजार ८२० रुपये, शनिवारी ३० हजार ६४० रुपये आणि रविवारी ३४ हजार ४८० रुपये इतके भाडे आकारले जात होते. नवीन दरानुसार सोमवार ते शुक्रवार १२ हजार १७० रुपये, शनिवारी १३ हजार ९०० रुपये आणि रविवारी १५ हजार ६४० रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. स्वनिर्मित नाट्यप्रयोग, एकांकिका या कार्यक्रमांसाठी ३०१ ते ५०० रुपये तिकीट दर असेल तर त्यासाठी यापुर्वी सोमवार ते शुक्रवार २९ हजार ३७० रुपये, शनिवारी ३३ हजार २१० रुपये आणि रविवारी ४२ हजार १४० रुपये इतके भाडे आकारले जात होते.

आता सोमवार ते शुक्रवार १३ हजार ३३० रुपये, शनिवारी १५ हजार ०६० रुपये आणि रविवारी १९ हजार ११० रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. स्वनिर्मित नाट्यप्रयोग, एकांकिका या कार्यक्रमांसाठी पाचशे रुपयांपेक्षा अधिक तिकीट दर असेल तर त्यासाठी यापुर्वी सोमवार ते शुक्रवार २९ हजार ३७० रुपये, शनिवारी ३३ हजार २१० रुपये आणि रविवारी ४२ हजार १४० रुपये इतके भाडे आकारले जात होते. नवीन दरानुसार सोमवार ते शुक्रवार १४ हजार ७०० रुपये, शनिवारी १६ हजार ६२० रुपये आणि रविवारी २१ हजार ०८० रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे.

ठाण्यातील दोन्ही नाट्यगृहातील भाडे दर मुंबई आणि नवी मुंबई महापालिका नाट्यगृहाच्या जास्त होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ या संस्थांनी केलेल्या मागणीचा विचार करून हे दर कमी करण्यात आले आहेत. मराठी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उभारी मिळावी या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच ही सवलत लागू असेल. ही सवलत घेऊन इतर कार्यक्रम केले तर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. – उमेश बिरारी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation has decided to reduce the rental rates of ram ganesh gadkari rangayatan and dr kashinath ghanekar natyagruha for marathi language programs dvr
Show comments