ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आखण्यात आलेल्या रस्ते प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याच्या कारणावरून टिकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिकेने आता शहरातील मोकळ्या जागांवर वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्ष लागवडीसाठी सुविधा भुखंड, स्मशानभूमी, रुग्णालये, शाळांच्या परिसरातील मोकळ्या जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे. शहरात पक्षांचा वावर वाढावा यासाठी फळझाडांची लागवड केली जाणार असून याशिवाय, शहरातील उद्यानांमध्ये पाच हजार शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी खाडी किनारी मार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग अशा प्रकल्पांची आखणी करण्यात आली असून यापैकी काही प्रकल्पांची कामेही सुरू झाली आहेत. या प्रकल्पांसाठी शहरातील हजारो वृक्ष तोडण्यात येत असून त्याचबरोबर गृह प्रकल्पांसाठीही वृक्ष तोडण्यात येत आहेत. त्यास परवानगी देणाऱ्या पालिका वृक्ष प्राधिकरण विभागावर टिका होत होती. या टिकेनंतर आता वृक्ष प्राधिकरण विभागाने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सुविधा भुखंड, स्मशानभुमी, मैदाने, उद्याने आणि रस्त्यालगत देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दुजोरा दिला आहे.
अर्बन फॉरेस्टची उभारणी

ठाणे शहरातील मोकळ्या जागांवर अर्बन फॉरेस्ट (छोटी जंगले ) उभी केली जाणार आहेत. या ठिकाणी पक्षी, प्राणी यावेत, यासाठी आंबा, जांभूळ यासह इतर फळ आणि फुल झाडांची लागवड केली जाणार आहे. यापूर्वी शेवग्याच्या ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच बांबूची लागवड देखील विविध ठिकाणी केली जाणार आहे.

भुखंडांचा शोध सुरू

ठाणे शहरातील सुविधा भुखंड, स्मशानभूमी, रुग्णालये, शाळांच्या परिसरातील मोकळ्या जागांचा शोध घेऊन त्यावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाने शहर विकास विभागाकडून अशा भुखंडांची यादीही मागविली आहे. याशिवाय, या विभागाने आतापर्यंत शहरातील १६ सुविधा भुखंड शोधले आहेत. याठिकाणी कोणते वृक्ष लावले जाऊ शकतात याचाही अभ्यास करण्यात आला आहे.