ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत रस्ते नुतनीकरण, सुशोभिकरण तसेच इतर नागरि प्रकल्पांची कामे सुरू असतानाच, या उपक्रमांतर्गत आता शहरातील रस्ते सफाईचे नवे नियोजन पालिका प्रशासनाने आखले आहे. येत्या १ सप्टेंबरपासून या नियोजनाची अंमलबजावणी होणार असून त्यासाठी रस्ते सफाईच्या कंत्राटातील अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या नियोजनानुसार सकाळ आणि रात्री अशा दोन सत्रात रस्ते सफाई करण्याबरोबरच सफाईच्या वेळा, गणवेश, साधने यात बदल करण्यात आला आहे. शहरातील रस्ते सफाई दर्जेदार व्हावी, या उद्देशातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईची कामे कंत्राटदारांमार्फत करण्यात येतात. परंतु ही कामे योग्यप्रकारे होत नसल्याची बाब आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आली होती. वर्षोनुवर्षे रस्ते सफाईची कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या कामाविषयी आयुक्त बांगर हे फारसे समाधानी नव्हते. त्यांनी ठेकेदारांना इशाराही दिला होता. दरम्यान, रस्ते सफाईच्या कंत्राटाची मुदत नुकतीच संपुष्टात आली. पालिकेकडून नव्याने रस्ते सफाईचे कंत्राट काढण्यात आले. स्वच्छतेचा दर्जा चांगला असावा यासाठी आयुक्त बांगर यांनी नवे नियोजन आखले असून त्यानुसार संबंधित कंत्राटांमध्ये अटी व शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या नियोजनात सकाळ आणि रात्री अशा दोन सत्रात रस्ते सफाई करण्याबरोबरच सफाईच्या वेळा, गणवेश, साधने यात बदल करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सफाईच्या कामासाठी एकूण २३ गट कार्यरत आहेत. त्यात आता ओवळा भागासाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. वाढत्या ठाण्यातील साफसफाईच्या कामाला स्वतंत्र मनुष्यबळ मिळणार आहे.
हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात सध्या लंपी चर्मरोगाचा प्रादूर्भाव नाही
निरीक्षक आणि त्यांच्यासोबतच विभागनिहाय स्वच्छता कर्मचारी असे गट महापालिका क्षेत्रात कार्यरत असतात. एकूण १३ कंत्राटदारांच्या मदतीने २३ गटांच्यामार्फत शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २३ गट सफाईसाठी कार्यरत असतील. त्यांचा वार्षिक खर्च सुमारे ४५ कोटी रुपयांच्या घरात आहे. रस्ते झाडून जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी आतापर्यंत पत्र्याची गाडी वापरली जात आहे. यापुढे टप्प्याटप्याने सगळीकडे १२० किंवा २४० लिटरचे डबे दिले जाणार आहेत. आतापर्यंत लांब झाडूने सफाई करण्याची पद्धत होती. यापुढे सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कडक काड्या असलेले त्रिकोणी झाडू देण्यात येणार आहेत. या झाडूमुळे अधिक चांगली सफाई करता येईल. रस्त्यावर चिकटलेला कचरा, ओली माती काढणे, कोपरे साफ करणे या झाडूमुळे शक्य होणार आहे, अशी माहिती आयुक्त बांगर यांनी दिली. दररोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू होणे आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण केली जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतर्गत रस्ते साफ केले जातील. हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर, दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे. आतापर्यंत एका गटामार्फत रात्र पाळीतील सफाई होत होती. त्यात आणखी एका गटाची भर घालण्यात आली आहे, अशी माहिती बांगर यांनी दिली.
हेही वाचा >>>शिवसेनेच्या डोंबिवलीतील ‘मंगळगौर’ फलकाची जोरदार चर्चा
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याना यापुढे वेगळे गणवेश दिले जातील. त्यातही सकाळी काम करणाऱ्यांचा गणवेश रंग वेगळा असेल. तर, संध्याकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश वेगळा राहील. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी पूर्वीप्रमाणेच खाकी गणवेश परिधान करतील. शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांकडून उत्कृष्ट कामाची अपेक्षा ठेवली जाते. त्याचवेळी त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील आणि त्यांच्या व कुटुंबियांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी या बाबीही सुनिश्चित करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याशिवाय कंत्राटदारांची मासिक देयके अदा केली जाणार नाहीत, असा इशारा बांगर यांनी दिला आहे.
आणखी यांत्रिकी गाड्या
शहरातील वाढती लोकसंख्या तसेच, झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता आणि रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे वाढते प्रमाण पाहता यांत्रिकी पद्धतीने साफसफाईवर अधिक भर देणे गरजेचे आहे. सध्या दोन गाड्यांद्वारे यांत्रिकी पद्धतीने सफाई केली जात आहे. त्यात लवकरच आणखी चार गाड्यांची भर पडणार आहे. एकूण सहा गाड्यांद्वारे प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करून त्या रस्त्यांवरील मोकळे झालेले मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली.