ठाणे: तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरात २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई काही दिवसांपुर्वी सुरू केल्या असून त्यापाठोपाठ आता आणखी २५ पाणपोई पालिकेने सुरू केल्या आहेत. यामुळे शहरातील तात्पुरत्या पाणपोईंची संख्या आता ५० इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे.

महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका आणि काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट ॲण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्याआधारे सिग्नलच्या प्रतिक्षेत असलेल्या वाहनचालकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पालिकेने जाळीचे आच्छादन टाकले आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील २५ गर्दीच्या ठिकाणी पालिका प्रशासनाने विविध स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने पाणपोई सुरू केल्या होत्या.

पहिल्या टप्प्यात या येस चॅरिटेबल ट्रस्ट, जेव्हीएम चॅरिटेबल फाऊंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहभागातून पाणपोई सुरू करण्यात आल्या होत्या. या पाणपोईची संख्या वाढवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार, पर्यावरण विभागाने क्रेडाई-एमसीएचआय या संस्थेच्या सहकार्याने आणखी २५ तात्पुरत्या पाणपोई सुरू केल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

शहरातील तात्पुरत्या पाणपोईंची संख्या आता ५० इतकी झाली आहे. या ठिकाणी पाण्याचे मोठे माठ आणि ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित स्वयंसेवी संस्था करीत आहे.

नवीन पाणपोईची ठिकाणे

कोपरी बस स्टॉप-हनुमान मंदिरासमोर, सिडको स्टॉप-मंदिराजवळ, खोपट रिक्षा स्टॅण्डजवळ, गावदेवी पार्किंग, जांंभळी नाका, आरटीओ-जेल जवळ, खोपट एसटी स्टॅण्ड, वंदना एसटी स्टॅण्ड, बी-केबीन, तीन हात नाका – रिक्षा स्टॅण्ड, घोसाळे तलावाजवळ, कॅडबरी सिग्नल-शेअर रिक्षा स्टॅण्ड, वृंदावन बस थांबा, गोकूळनगर बस थांबा, कॅसल मिल सर्कल, १६नंबर- शेअर रिक्षा स्टॅण्ड, मानपाडा चौक – टेम्पो स्टॅण्ड, ढोकाळी – शेअर रिक्षा स्टॅण्ड, मानपाडा-टायटन हॉस्पिटलसमोर, वसंत विहार बस थांबा, शास्त्रीनगर नाका, दिवा महोत्सव नाका, दिवा-आगासन रोड, खर्डीगाव-खर्डीपाडा, दिवा-शीळ रोड-शीळफाटा या ठिकाणी नव्याने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.

आधीच्या पाणपोईची ठिकाणे

ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, एमआयडीसी-अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस बस थांबा, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन रोड, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर पोलीस चौकी-मुंब्रा, लोकमान्य डेपो, मध्यवर्ती कारागृहाच्या मागे- राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका, बाळकूम येथे यापूर्वी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.