ठाणे : पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदाही नालेसफाईची कामे करण्याची तयारी सुरू झाली असून यासाठी पालिकेने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढून २५ मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखले आहे. या कामांसाठी पालिका १० कोटी २९ लाख रुपये खर्च करणार आहे. याशिवाय, पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्याची रुंदी वाढविण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव काढून टाकणे, अशी कामेही करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे ठाणे महापालिकेक़डून दरवर्षी एप्रिल महिन्यात नालेसफाईच्या कामांना सुरूवात करण्यात येते. ही कामे ३१ मेपुर्वी पुर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, निविदा प्रक्रीया उरकून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरूवात होते. यामुळे ३१ मे पर्यंतच्या मुदतीत ही कामे पुर्ण होत नाहीत. पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे सुरूच असतात. यावरून पालिका प्रशानावर टिका होत असते. हि बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने यंदा मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांसाठी निविदा काढल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती निहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून या कामांसाठी पालिका १० कोटी २९ लाख रुपये खर्च करणार आहे. पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे पुर्ण व्हावीत यासाठी २५ मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखले आहे.

गटारांचीही सफाई

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आतापर्यंत केलेल्या शहराच्या पाहाणी दौऱ्यादरम्यान त्यांना काही बाबी निर्दशनास आल्या होत्या. उड्डाण पुलाखाली गटारांची सफाई होत नसल्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. काही वेळेस तिथे इतर वाहीन्यांमुळे पाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. अनेक नाल्यांचे मुख भरावामुळे निमुळते झाले आहे, असे आयुक्त राव यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्याची रुंदी वाढविण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव काढून टाकणे, अशी कामे करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित साहाय्यक आयुक्तांनी अशा नाल्यांची पाहाणी केल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.

खर्चात वाढ

ठाणे महापालिकेने गेल्यावर्षी नालेसफाईसाठी ९ कोटी १५ लाख रुपये खर्च केले होते. यंदा पालिका १० कोटी २९ रुपये खर्च करणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नालेसफाईच्या कामांच्या खर्चात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु नालेसफाईच्या कामांसाठी दरवर्षी होणारा वाढीव खर्च आणि नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यांची सफाई यामुळे खर्चात वाढ झाल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.

पालिका क्षेत्रातील नाल्यांची संख्या

प्रभाग समिती – नाल्यांची संख्या

कळवा – २०१

दिवा – १३१

नौपाडा- ४९

वागळे इस्टेट- ३८

लोकमान्य-सावरकरनगर – ३४

उथळसर – ४

वर्तकनगर – २९

माजीवाडा- मानपाडा – ४४

मुंब्रा – ८०

Story img Loader