ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक नागरिकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षाने विरोध केल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील कचरा भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमीवर नेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, ठाणे ते आतकोली अंतर ३७ किलोमीटर इतके असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून शहरात घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे गृहसंकुलाच्या बाहेर तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा साठल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, शहरातील कचरा उचलण्यासाठी २० हून अधिक वाहने भाडयाने घेण्यात आली असून येत्या दोन दिवसांत परिस्थिती पुर्वपदावर येईल, असा दावा पालिकेने केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. डायघर भागात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला असला तरी, तो पुर्णपणे अद्याप कार्यान्वित होऊ शकलेला नाही. ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी शहरातील विविध भागात संकलित होणारा कचरा आणला जातो आणि त्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते. यानंतर तो डायघर येथे नेला जातो. असे असले तरी याठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठे गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक हैराण आहेत. त्यातच गेल्या आठ दिवसांत या केंद्रावरील कचऱ्याला दोनदा आग लागली. या आगीचा धूर परिसरात पसरल्याने नागरिकांना त्रास झाला. यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागताच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच यापुढे या केंद्रावर एकही कचरा गाडी आणू नका आणि गाडी आणण्याचा प्रयत्न केला तर गाड्या फोडून टाकू असा इशारा शिंदे समर्थकांनी दिला होता. यानंतर पालिका प्रशासनाने भिवंडी येथील आतकोली परिसरात राज्य शासनाने कचराभुमीसाठी दिलेल्या जागेवर कचरा नेण्यास सुरूवात केली आहे. परंतु ठाणे ते आतकोली अंतर ३७ किलोमीटर इतके असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून शहरात घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे गृहसंकुलाच्या बाहेर तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा साठल्याचे चित्र दिसून येत आहे. कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमी येथे शहरातील कचरा नेण्यात येत आहे. ठाणे ते आतकोली कचराभुमीचे अंतर ३७ किमी असल्यामुळे घंटागाड्यांचा प्रवास कालावधी वाढला आहे. परिणामी शहरात घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामुळे कचरा साठलेला दिसून येत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून दिवस रात्र कचरा उचलण्याचे काम सुरू असून त्यासाठी २० जास्त वाहने घेण्यात आली आहेत. यामुळे दोन दिवसांत परिस्थिती पुर्व पदावर येईल.- मनिष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका