ठाणे : तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असून त्याचबरोबर विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई करण्यात आली असून त्याचबरोबर तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई केली आहे. या आदशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यानुसार दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर निर्बंध असणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी, शाह यांचे आभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याऐवजी कूपनलिकेच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे. अंगणात पाणी मारू नये. नळ सुरू ठेऊन कपडे धुणे, भांडी घासणे, दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी. सोसायटीतील गळकी टाकी, जलवाहिनी, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होवू नये याची दक्षता घ्यावी. त्यासंदर्भात, तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा अशी गळती आढळल्यास संबंधीत इमारतीचे-सोसायटीची नळ जोडणी खंडीत करण्यात येईल. आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये. स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाण्याचा अनावश्यक साठा करू नये तसेच, साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी.
हेही वाचा >>> “नादी लागू नका, प्रकरणे बाहेर काढेन”, राजन विचारे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
इमारती, सोसायटी, संकुलांमधील तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नये आणि वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत. कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने होईल. कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणार निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे दोन दिवस फ्लशसाठी, बाथरुम धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी तसेच बगीच्यासाठी वापरावे, अशी सूचनाही प्रशासनाने केली आहे.