ठाणे : ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील हाजुरी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका चाळीमधील घराची २० फुट लांब आणि ५ फुट उंच असलेली भिंत धोकादायक होऊन बाजूच्या घरांच्या भिंतीवर पडून टेकली. यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने चार घरे रिकामी करून घरामधील २८ रहिवाशांची राहण्याची सोय जवळ असलेल्या मदरसामध्ये केली.
वागळे इस्टेट येथील हाजुरी भागातील मौलाना आझाद शाळेजवळ गंगाधर चाळीमधील क्रमांक १ च्या खोलीचे बांधकाम तळ अधिक एक मजली आहे. अंदाजे ३५ वर्षे जुन्या असलेल्या बांधकाम असलेल्या या खोलीचे मालक खलील अन्सारी हे आहेत. त्यांच्या घराची अंदाजे २० फूट लांब आणि ५ फूट उंच असलेली भिंत शुक्रवारी सायंकाळी बाजूला असलेल्या घरावर पडून टेकली होती. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, पालिकेचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी या सर्वांनी धाव घेतली.
धोकादायक भिंत अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने काढून बाजूला करण्यात आली. हे काम करत असताना घराची भिंत पडून बाजूला असलेल्या बाबूलाल विश्वकर्मा यांच्या घराचे पत्रे तुटून नुकसान झाले. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव पालिका प्रशासनाने चार घरे रिकामी केली असून त्यातील २८ रहिवाशांची राहण्याची सोय जवळ असलेल्या मदरसामध्ये करण्यात आली आहे. तसेच घराच्या चारी बाजूने धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग केले आहे. या ठिकाणी पुढील कार्यवाही नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागामार्फत करण्यात येणार आहे.
खलील अन्सारी, सादिक अन्सारी, निजाम अन्सारी आणि बाबूलाल विश्वकर्मा या चार मालकांच्या खोल्या सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेने रिकाम्या केल्या आहेत. यातील खलील यांच्या घरात दहा व्यक्ती, सादिक यांच्या घरात आठ व्यक्ती, निजाम यांच्या घरात ४ व्यक्ती आणि विश्वकर्मा यांच्या घरात ६ व्यक्ती राहतात. अशा एकूण २८ रहिवाशांची राहण्याची सोय जवळ असलेल्या मदरसामध्ये करण्यात आली आहे.