निलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : प्राण्यांवर उपचार करणाऱ्या, त्यांना खाऊ घालणाऱ्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्राणीमित्रांची संघटना उभी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.

शहरातील अनेक भागांत प्राणीप्रेमी प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायटीच्या आवारात अन्न घालतात. त्यास काही नागरिक विरोध करतात. त्यातून वादाचे प्रसंग उद्भवतात. त्याच्या तक्रारी आता महापालिकेकडे येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता असे प्रकार टाळण्यासाठी प्राणीमित्रांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

भटक्या श्वानांवर अन्नातून विषप्रयोगासारखे प्रकार थांबावेत आणि अशा प्राण्यांची माहिती प्रशुवैद्यकीय विभागापर्यंत त्वरित पोहोचावी यासाठीही या प्राणीमित्र संघाची मदत घेतली जाणार आहे. ठाणे शहरातील भटक्या श्वानांची नसबंदी करण्याचे काम महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग करतो. त्याचबरोबर भटक्या श्वानांचे लसीकरण, शहराच्या विविध विभागांतील भटक्या श्वानांना जेरबंद करणे, त्यांची नसबंदी इत्यादी कामेही या विभागामार्फत केली जातात. श्वानांच्या शरीरावर नसबंदी आणि लसीकरणाची खूण केली जाते. परंतु ही मोहीम म्हणावी तितक्या प्रभावीपणे राबवली जात नाही, अशा तक्रारीही करण्यात येतात. भटक्या श्वानांना पकडण्यासाठी महापालिकेचे पथक येते, त्यावेळी अनेक श्वान पळून जातात. यामुळे त्यांची नसबंदी आणि लसीकरण करणे शक्य होत नाही. तसेच या प्रक्रियेत अनेकदा श्वान जखमी होतात. त्यापैकी अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो.

हेही वाचा >>>मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

नसबंदी, लसीकरणासाठी मदत

कोणत्या परिसरात किती भटके प्राणी आहेत, याची सविस्तर माहिती प्राणीमित्रांना असते. या प्राण्यांशी त्यांची मैत्री असते. ही मंडळी प्राण्यांना योग्यप्रकारे हाताळतात. त्यांच्या मदतीने भटके श्वान, मांजरी पकडून त्यांची नसबंदी आणि लसीकरण मोहीम सहजपणे राबविणे शक्य होऊ शकते.

परिसर स्वच्छतेचाही उद्देश

भटक्या प्राण्यांना खाद्यपदार्थ घातल्यानंतर तो परिसर स्वच्छ करण्यात यावा यासाठीही प्राणीमित्रांची मदत होऊ शकते. त्याचबरोबर जखमी झालेल्या भटक्या प्राण्यांना तात्काळ उपचार मिळावेत आणि त्याचबरोबर नागरिकांवर हल्ले करणाऱ्या प्राण्याला तात्काळ जेरबंद करता यावे, यासाठीही प्राणीमित्रांची मोठी मदत होऊ शकते.

हेही वाचा >>>मुंबईतील हॉटेलांना मेलेल्या कोंबड्यांची विक्री, मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले

प्राणीनोंदीसाठीही उपयोग

प्राणीमित्रांच्या मदतीने परिसरातील प्राण्यांची नोंदणीही करणे शक्य होणार असून त्याचबरोबर कोणता प्राणी आक्रमक आहे, हेही समजू शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन पालिकेने प्राणीमित्रांची संघटना बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातला पहिला प्रयोग

प्राण्यांना अन्न घालण्यावरून होणारे वाद टळावेत, भटके श्वान, मांजरांची संख्या वाढलीच तर नसबंदी आणि लसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाला मदत करणारे, माहिती देणारे स्वयंसेवक आणि प्राणीमित्र यांचा एक संघ उभा करण्याचा महापालिकेचा हा प्रयत्न आहे. महापालिका प्रशासनामार्फत केला जाणारा अशा प्रकारचा हा राज्यातला पहिला प्रयोग आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात प्राणीमित्रांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्जही उपलब्ध करण्यात आले आहेत. श्वानांची नसबंदी आणि लसीकरणाच्या कामात प्राणीमित्रांची मदत व्हावी, हा यामागील उद्देश आहे. –डॉ. क्षमा शिरोडकर, पशुवैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation initiative to build animal friendly organization amy
Show comments