ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने गेले अनेक वर्षे बिनदिक्कत सुरू असलेल्या शहरातील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर गुरुवारी हातोडा टाकला. दिवसभरात अनेक बार आणि अमली पदार्थाची विक्री होत असलेली बेकायदा बांधकामे पालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली. बेकायदा पब आणि बारचे केंद्र असलेल्या घोडबंदरच्या कोठारी कम्पाऊंड परिसरातही पालिकेने कारवाई केली. मात्र, काही बार आणि पबची केवळ बाहेरील शेड तोडण्यात आली.
ठाण्यातील बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारची बांधकामे तोडण्यात आली. काही वर्षांत शहरात बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार पुन्हा सुरू झाले. गेली तीन वर्षे ठाण्यातील तरुण पिढ्यांचा ऱ्हास घडवून करणाऱ्या अवैध व्यवसायांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी याआधीच ठाणे पोलिसांकडे केली होती.
हेही वाचा…शिळफाटा रस्त्यावरील टपऱ्या, गॅरेज, झोपड्यांवर कारवाई
तसेच त्यांनी यासंदर्भात लोकचळवळही सुरू केली होती. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे येथील ‘पोर्श’ अपघात प्रकरणानंतर ठाण्यातील बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तरीही शहरात हे अवैध व्यवसाय राजरोस सुरू होते.
पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. शहरांच्या विविध भागात पालिकेच्या नऊ प्रभाग समितीच्या पथकांची नेमणूक करण्यात आली. अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर कारवाई सुरू केली.
हेही वाचा…डोंबिवली जीमखाना रस्त्यावर पर्यटक बसचे अनधिकृत वाहनतळ, परिसरातील रहिवासी वाहन कोंडीने हैराण
कारवाई कुठे?
वर्तकनगर येथील ‘द सिक्रेट बार व हुक्का पार्लर’, घोडबंदर येथील खुशी बार, वागळे इस्टेट येथील इंडियन स्वाद आणि पांचाली बार, कापूरबावडी येथील स्वागत बार, ओवळा नाका येथील मयुरी बार यासह अनधिकृत टपऱ्या, पान टपऱ्या व बारवर कारवाई करण्यात आली. शिवाय घोडबंदरच्या कोठारी कंपाऊंड परिसरातील काही बेकायदा पब आणि बारचे बांधकाम तोडण्यात आले तर, काही पब आणि बारची केवळ बाहेरील शेड तोडण्यात आली. त्यामुळे पालिकेने दिखाव्यापुरती कारवाई केल्याची टीका होत आहे. ही कारवाई होऊ नये म्हणून पालिका अधिकाऱ्यांवर दबाबतंत्र वापरण्यात आल्याच्या मुद्द्यावर ठाण्यात चर्चा रंगली होती.
हेही वाचा…कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी
निव्वळ देखावा?
ठाण्यातील ‘ग्लॅडी अल्वारिस’ मार्गावरील कोठारी कम्पाउंडमध्ये गोदामांसाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. या जागांवर मनमानी बांधकाम करून पब, बार, हॉटेलांची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी हुक्का पार्लरही आहेत. मुंबईतील कमला मिलनंतर कोठारी कंपाउंडमधील पब, बार, हॉटेलांना अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले होते. तरीही पालिका प्रशासनाने या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नव्हती.