ठाणे : पावसाळ्यात इमारत बांधकामासाठी खोदलेले खड्ड्यांमुळे दुर्घटना होऊन जिवितहानी होऊ नये तसेच उत्खनन केलेली माती रस्त्यावर पसरून अपघात होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने बिल्डरांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. या सुचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली जाणार आहे, याबाबत नोटीसमध्ये काहीच स्पष्ट करण्यात आलेले नसून यामुळे पालिका दरवर्षी प्रमाणे यंदाही अशाप्रकारच्या केवळ नोटीसा बजावण्याचे कार्य पार पाडताना दिसून येत आहे.
हेही वाचा >>> बदलापूरः पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव, मध्यरात्री आणि पहाटेही वीज गायब झाल्याने नागरिक घामाघुम
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठे गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. तसेच शहरात जुन्या धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती तसेच इतर गृह प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ठाणे शहर, वर्तकनगर, घोडबंदर, कळवा, मुंब्रा, शीळ, दिवा अशा भागांमध्ये ही कामे सूरू आहेत. या प्रकल्पांसाठी खड्डे खोदण्यात येतात. त्यात पावसाळ्यात पाणी साचते. या खड्ड्याभोवती मार्गरोधक लावण्यात आलेले नसतील तर, त्यात पडून जिवीतहानीची घटना घडू शकते. खोदाई करण्यात आलेल्या परिसरातील मातीचा भाग ढासळून अपघात होण्याची भितीही असते. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या काळात परिसरात पाणी साचून पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. हि बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने शहरातील बिल्डरांना नोटीसा पाठवून त्यात पावसाळ्याच्या कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहेत.
हेही वाचा >>> अंबरनाथच्या कचराभूमीला भीषण आग; बंद कचराभूमीवर ज्वलनशील कचरा टाकल्याचा संशय
बांधकामाच्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्याभोवती मार्गरोधक उभारण्यात यावेत. खोदाई केेलेल्या भागातील माती ढासळून अपघात होऊ नयेत यासाठी आरसीसी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेऊन त्या भागाचे मजबुतीकरण करण्यात यावे. प्रकल्पाच्या ठिकाणी केलेली माती तसेच राडारोड्याची वाहतूक करताना ती रस्त्यावर पसरून अपघात होऊ नयेत याची काळजी घ्यावी. अतिवृष्टीच्या काळात प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी साचण्याची किंवा पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षा घेऊन त्याठिकाणी चोवीस तास मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध असणे आवश्यक आहे, अशा सुचना नोटीसमध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच पावसाळ्यात निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्यास बिल्डरांची संपुर्ण जबाबदारी राहिल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
तर त्यांचे काम थांबवणार ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून दरवर्षी अशाचप्रकारच्या नोटीसा बजावण्यात येतात. यंदाही अशाचप्रकारच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. यातील सुचनांचे पालन बिल्डरांकडून केले जाते. परंतु जे करीत नाहीत, त्यांना दोन ते तीन वेळा सांगण्यात येते. त्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांचे काम थांबविण्याची कारवाई करण्यात येते, असे शहर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.