ठाणे : पंचवार्षिक मुदत संपल्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राजवटीत कारभार सुरु असलेल्या ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीमधील माजी पालिका पदाधिकाऱ्यांचा कार्यालयांमध्ये वावर सुरु असल्याचे चित्र होते. या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने ही सर्वच कार्यालये बुधवारी पुन्हा बंद केली. यापुर्वी सुद्धा ही कार्यालये बंद करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यातच ही कार्यालये पुन्हा सुरु झाली होती. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ५ मार्च रोजी संपुष्टात आली असून या दिवसापासूनच नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. त्याचबरोबर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, गटनेते या पदावर कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तरीही पालिकेतील पदाधिकाऱ्यांची कार्यालये मात्र सुरुच असल्याचे चित्र दिसून येते होते.
हेही वाचा >>> ठाणे : पिंपळाचे वृक्ष तोडल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल
माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यालयांमध्ये वावर सुरु असल्याचे दिसून येत होते. तसेच सर्व पक्षीय गटनेत्यांची कार्यालयेही खुली असल्याने त्याठिकाणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसून येत होती. यावरून पालिका प्रशासनावर टिका होत होती. यामुळे महिनाभरानंतर प्रशासनाने ही कार्यालये बंद केली होती. परंतु काही महिन्यातच ही कार्यालये पुन्हा सुरु झाली होती. या कार्यालयांमध्ये माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा वावर पुन्हा सुरु झाला होता. याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी महापालिका प्रशासनावर टिका करत ही कार्यालये बंद करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा >>> डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती विभागातील महिलांचे एक हजार दिवस समुपदेशन
महापालिकेतील महापौर आणि सर्वच नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ एक वर्षांपुर्वीच संपुष्टात आल्यामुळे हे सर्वचजण सर्वसामान्य नागरिक झाले असतानाही हे सर्वजण महापालिकेतील पक्ष कार्यालय, महापौर दालन आणि महापौर निवासामध्ये ठाण मांडून बसण्याबरोबरच ठाणेकरांच्या कराच्या पैशाची नासाडी करत असल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला होता. माजी महापौर तसेच नगरसेवकांना पालिकेतील कार्यालयांमध्ये बसण्यास बंदी घालून कायार्लये बंद करावीत, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच ही मागणी मान्य झाली नाहीतर ठाणेकरांना सोबत घेऊन महापालिका मुख्यालयात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिका मुख्यालयातील पदाधिकारी आणि पक्ष कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार प्रशासनाने ही सर्व कार्यालये बंद केली आहेत.