प्रदूषण टाळण्यासाठी ठाणे महापालिकेचा नवा प्रस्ताव

उल्हास नदीपात्रापासून मुंब््रयाच्या रेतीबंदरापर्यंत आणि पुढे मानखुर्द-वाशी खाडीपुलापर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या ठाणे खाडीतील प्रदूषण रोखण्यासाठी किमान ठाणे महापालिकेच्या स्तरावर काय करता येईल या दृष्टीने अभ्यास सुरू झाला असून शहरातील विविध भागांमधील नाल्यांमधून खाडीत पाणी जाण्याआधी नाल्यांच्या तोंडावर जाळ्या बसवून कचरा रोखता येईल का, यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. वाढत्या प्रदूषणामुळे ठाणे खाडीचे पर्यावरण पार धुळीस मिळाले असून खाडी संवर्धनासाठी महापालिकेने सुशोभीकरण आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ात नाल्यांना जाळ्या लावून कचरा अडविण्यासंबंधी तंत्रज्ञानाची भर टाकण्याचा विचार सुरू झाला आहे.

ठाणे खाडीमध्ये मुंबई, ठाणे महापालिका तसेच ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रातून लाखो लिटर सांडपाणी सोडले जाते. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे दर वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर गायमुख, कोलशेत, साकेत, कळवा रेतीबंदर, मुंब्रा, विटावा आणि कोपरी अशा नऊ ठिकाणी खाडीचे पाणी तपासले जाते. या तपासणीत विशेषत: फॉस्फेटस्, नाइट्रेट, अमोनिअल नायट्रोजन, फेरस, कॅडमिअम, शिसे, आम्लता अशा घटकांची पाहणी करण्यात आली. विशेषत: ओहटीच्या वेळी खाडीच्या पाण्याची तपासणी करून जल विश्लेषण अहवाल तयार करण्यात आला असून त्याद्वारे ठाणे खाडीचे पर्यावरण धोक्यात सापडल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

महापालिकेने केलेल्या पाहणी विश्लेषणात ठाणे खाडी बांधकामांचा तसेच नाल्यांमधून येणाऱ्या घनकचऱ्याच्या शिरकावामुळे किनाऱ्यालगतच्या पाण्याच्या प्रवाहाची गती कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय खाडीच्या खोलीतही घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे रेतीचा बेसुमार उपसा आणि दुसरीकडे कचऱ्याची पडणारी भर यामुळे अनेक ठिकाणी खाडीची खोली असमान होत असून त्याचा पर्यावरणाला फटका बसण्याची भीती पर्यावरण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खाडीचे पर्यावरण पुनस्र्थापित करण्यासाठी दूषित पाणी तसेच घनकचऱ्याचे प्रमाण किमान पातळीवर रोखण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने तयार केलेल्या खाडी संवर्धन आराखडय़ात नाल्यांमधून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजण्याचे ठरविले आहे. शहरातील विविध भागांमधून ठाणे खाडीत सोडल्या जाणाऱ्या नाल्यांच्या तोंडावर जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव या निमित्ताने आखण्यात आला आहे.

खाडीसंवर्धन आराखडय़ात या प्रकल्पाचा समावेश करण्यात येणार असून याशिवाय ठिकठिकाणी खाडीची तळसफाई करून गाळ उपसणे, बायो प्रॉडक्ट टाकणे यांसारखे उपाय आखण्याचा विचार सुरू झाला आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Story img Loader