ठाणे :  हवा प्रदूषण प्रकरणी ३६२ जणांना नोटिसा बजावण्याबरोबरच एक आरएमसी प्लांट बंद करण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने बुधवारी केली. तसेच आनंदनगर चेक नाका मार्गे शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या २१ डम्परवर भरारी पथकाने कारवाई केली असून त्याच्यासह इतर कारवाईत पालिकेने एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा >>> मुंब्रा शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे आखून देत त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी भरारी पथके तयार केली आहेत. हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत असलेले घटक निश्चित करून त्यावर निर्बंध आणण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुंबईहून शहरात येणाऱ्या राडारोड्याच्या गाड्या रोखण्यासाठी मुलूंड चेक नाक्यावर पथक नेमण्याचा तसेच बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शहराबाहेरून होणारी राडारोड्याची वाहतूक रोखण्यासाठी आनंद नगर चेक नाक्यावर बुधवारी सकाळपासून भरारी पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या २१ डम्परवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत एक आरएमसी प्लांट बंद करण्यात आला. शहरात सुरू असलेली बांधकामे, बायोमास जाळणे, राडोरोड्याची वाहतूक यांना नियमावलीचे पालन करण्यासाठी ३६२ जणांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.