ठाणे : महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा हे गेल्या आठवड्यापासून शहरात विकासकामांचा पाहणी दौरा करीत असून सोमवारी त्यांनी कळवा खारेगाव परिसरात केलेल्या दौऱ्यादरम्यान पालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी टीएमटीच्या बसगाडीमधून प्रवास केला. या दौऱ्याच्यानिमित्ताने सर्वच अधिकाऱ्यांनी टीएमटीच्या सफर केल्याचे दिसून आले.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही शहराचा दौरा करून तलाव सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली. त्यापाठोपाठ त्यांनी सोमवारी कळवा खारेगाव परिसरातील विकासकामांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, मारुती खोडके यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या सर्वांनी ठाणे महापालिका मुख्यालय ते कळवा पारसिक रेतीबंदर असा टीएमटी बसमधून प्रवास केला. त्यानंतर आयुक्त शर्मा यांच्यासमवेत खरेगाव भागाचा दौरा केला. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णाालयाची पाहणी करुन आढावा घेतला.