ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गेल्या आठवडय़ापासून शहराचा पाहाणी दौरा सुरू करून विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी सर्वच पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कळवा-खारेगाव भागातील विकासकामांची पाहाणी करून संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या दौऱ्यात सामील झालेल्या पालिकेच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्याचे टाळत टीएमटीच्या एकाच बसमधून प्रवास केला.
महापालिका आयुक्तांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी शहराचा दौरा करून तलाव सुशोभीकरण, रस्ते आणि साफसफाई कामांची पाहणी केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी सोमवारी कळवा खारेगाव परिसरातील विकासकामांचा पाहणी दौरा करून सुशोभीकरण, साफसफाई, कळवा खाडी पूल कामाचा आढावा घेतला. या दौऱ्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, मनीष जोशी, मारुती खोडके यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या सर्वानी ठाणे महापालिका मुख्यालय ते कळवा पारसिक रेतीबंदर असा टीएमटी बसमधून प्रवास केला. येथून त्यांनी आयुक्त डॉ. शर्मा यांच्यासमवेत खारेगाव भागातून दौऱ्याला सुरुवात केली. कळवा आणि खारेगाव भागातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच रुग्णालयाची किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
कळवा परिसरातील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, पदपथाची दुरुस्ती, दुभाजकाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. तसेच रेतीबंदर गणेश विसर्जन घाट, आत्माराम पाटील चौक, रेतीबंदर खारेगाव रस्ता, साईनाथ नगर, सह्याद्री स्कूल, कळवा चौक या ठिकाणांची पाहणी करत त्यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, पदपथ साफ ठेवणे अशी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच कळव्यातील कै. मुकुंद केणी क्रीडा संकुलाचीही त्यांनी पाहाणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा