ठाणे : ठाणे महापालिकेच्या नवीन आलिशान प्रशासकीय इमारतीच्या कामात अडसर ठरत असलेली ६३१ वृक्ष तोडण्याच्या तर, २ हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याच्या प्रस्तावावरून टिका होऊ लागताच, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने आता २ हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपण पालिका मुख्यालय परिसरातील मोकळ्या जागेतच करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेकडून या भागातील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ५७२ कोटी रुपये खर्चुन ठाणे महापालिकेची नवीन आलिशान प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत ज्या जागेवर उभारली जाणार आहे, तिथे यापुर्वी भव्य असे उद्यान आहे. या उद्यानाच्या जागेचे आरक्षण बदलून तिथे महापालिका इमारत उभारण्याचा निर्णय महापालिकेेने यापुर्वीच घेतला आहे. इमारतीच्या कामात अडसर ठरत असलेली ६३१ वृक्ष तोडण्याचा तर, २ हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. याबाबत पालिका प्रशासनाने हरकती आणि सुचनाही मागविल्या आहेत.

भव्य उद्यान आणि वनराईच्या मोहात याठिकाणी कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांना या प्रस्तावामुळे धक्का बसला आहे. या नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यांनी वृक्ष तोड आणि पुनर्रोपणास विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावावरून पालिका प्रशासनावर टिका होऊ लागताच, पालिकेने आता २ हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपण पालिका मुख्यालय परिसरातील मोकळ्या जागेतच करण्याचा विचार सुरू केला आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दुजोरा दिला. महापालिका मुख्यालय इमारत होणाऱ्या परिसरात पालिकेने तीन ते चार वर्षांपुर्वी वृक्षाचे रोपण केले होते. या भागातील हिरवळ पाहून घरे खरेदी करणाऱ्यांची निराश होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी जितकी झाडे तोडली जाणार आहेत, त्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात प्रत्येकी ४ झाडे लावली जाणार आहेत. शिवाय, २ हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपण पालिका मुख्यालय परिसरातील मोकळ्या जागेत केले जाणार असून त्यासाठी परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे बोडके यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation plans to replant 2097 trees at headquarters after criticism of cutting 631 trees sud 02