राज्य शासनाने बंदी घातलेल्या आणि पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात महापालिका विशेष मोहिम घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करते. या कारवाईनंतरही विक्रेत्यांकडून अशा प्लास्टीक पिशव्यांचा वापर सुरुच असल्याचे चित्र असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता स्वच्छता निरीक्षकांमार्फत त्यांच्या विभागात प्लास्टिकमुक्त मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये परिसरातील विक्रेत्यांकडून दररोज प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या जाणार आहेत. दररोज होणाऱ्या कारवाईमुळे विक्रेते हतबल होऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करतील, असा ही मोहिम राबविण्यामागचा पालिकेचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोहीम थंडावली, प्लास्टिकचा वापर वाढला
राज्य शासनाने पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर घातली आहे. तरीही ठाणे शहरातील विविध विक्रेत्यांमार्फत अशा पिशव्या ग्राहकांना दिल्या जातात. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येते. मध्यंतरी महापालिका प्रशासनाने अशा विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती. परंतु काही दिवसांतच ही कारवाई थंडावल्यामुळे शहरात अशा पिशव्यांचा वापर पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. होळीच्या पार्श्वभूमीवरही पालिकेने अशीच विशेष मोहीम राबवून विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. या मोहिमेत पाच हजारांचा दंड वसूल केला जात होता. परंतु होळीनंतर ही मोहिमही पुन्हा थंडावली. यामुळे पिशव्यांचा वापर पुन्हा वाढू लागल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता प्लास्टिकमुक्त मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून या निरीक्षकांची संख्या ५० आहे. त्याचबरोबर उपमुख्य स्वच्छता निरीक्षकांची संख्या १० आहे. या सर्वांकडे आपला विभाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असते. त्यांना प्लास्टिक मुक्त मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक परिसरात दररोज सातत्याने फेरफटका मारणार असून त्यात दुकाने, हातगाड्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळून आल्या तर त्या जप्त करणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी तसे आदेश स्वच्छता निरीक्षकांना दिले असून त्यानुसार त्यांनी परिसरात प्लास्टिक जप्तीची कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दंडाच्या रकमेवरून वाद
दुकाने, हातगाड्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळून आल्या तर त्या विक्रेत्यांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. या कारवाईदरम्यान दंडाच्या रक्कमेवरून पथक आणि विक्रेत्यांमध्ये वाद होतो. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचतो. तसेच या दंडात्मक कारवाईनंतरही विक्रेत्यांची भीड चेपली जात नसून ते सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसून येतात. सातत्याने ही कारवाई होत नसल्यामुळेच विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. यामुळेचे पालिकेने आता ही कारवाई दररोज करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.