ठाणे : आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षीची रक्कम आणि थकबाकी वसुल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्याबरोबरच आवश्यक तेथे जप्ती, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना बैठकीत दिले आहेत. यामुळे शहरातील मोठ्या कर थकबाकीदारांवर कारवाईची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेच्या २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला ८५७ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. यामुळे नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाला होता. निवडणुक संपताच ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम डिसेंबर महिनाअखेर दिसून आले होते. डिसेंबर महिनाअखेरपर्यंत ५६४ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३७ कोटी रुपयांनी करवसुली अधिक झाली आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अभय योजनेच्या सवलतीमुळे ७२ कोटींची वसुली झाली होती. तर, यंदाच्या डिसेंबर महिन्यात अभय योजनेविना ७८ कोटींची कर वसुली झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ झाली असली तरी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अडीच महिनेच शिल्लक राहिले आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट ८५७ कोटी रुपये असून आतापर्यंत ५७६ कोटींची वसुली झाली आहे. तर, पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य २२५ कोटी रुपये असून त्यापैकी ८० कोटींची वसुली झालेली आहे. यामुळे उर्वरित कर वसुलीसाठी आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. मालमत्ता कर आणि पाणी देयकातून येणारा महसुल हा महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वसुलीची उद्दिष्ट पूर्ती तातडीने व्हावी, असे आयुक्त राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षीची रक्कम आणि थकबाकी वसुल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करावा. आवश्यक तेथे जप्ती, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाईही करण्यात यावी. तसेच, प्रलंबित वसुली, त्यातून वसुलीची शक्यता, त्यासाठीचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधून पुढील दोन महिन्यांच्या काळात वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातील आठ अल्पवयीन मुली पळाल्या
नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. यानुसार, ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे. माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, यांचा समावेश आहे.