ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या सोडविण्यासाठी डायघर येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पात कचऱ्यावर कोणतीही प्रक्रीया होत नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी प्रकल्पास विरोध सुरू केला असून यामुळे शहरात कचरा समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने आता ही समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने कचराभुमीसाठी दिलेल्या भिवंडीतील आतकोली भागातील जागेवर नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन (एनटीपीसी) या शासकीय कंपनीच्या माध्यमातून कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मीतीचा प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. याठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नव्हती. कचरा दुर्गंधी आणि आगीमुळे परिसरात धुर पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांच्या विरोधानंतर पालिकेने ही कचराभुमी बंद करून डायघर कचरा प्रकल्प सुरू होईपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भांडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात कचराभुमी उभारली होती. डायघर प्रकल्प काही प्रमाणात सुरू होताच पालिकेने भांडर्ली कचराभुमी बंद केली. डायघर प्रकल्प सुरू झाला असला तरी तो पुर्णपणे कार्यान्वित होऊ शकलेला नाही. तसेच या प्रकल्पात कचऱ्यावर कोणतीही प्रक्रीया होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत असून त्यांनी या प्रकल्पास विरोध करण्यास सूरूवात केली आहे. त्यामुळे शहरात कचरा कोंडीची समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन पालिकेने कचरा विल्हेवाटीसाठी पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने कचराभुमीसाठी दिलेल्या भिवंडीतील आतकोली भागातील जागेवर कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मीतीचा प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन (एनटीपीसी) या शासकीय कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

हे ही वाचा… वालधुनीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रकल्प आराखडा, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून निविदा मागिवली

हे ही वाचा… कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर पिस्तूलच्या गोळीने जखमी

ठाणे महापालिकेने कचराभुमीसाठी जागा देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार, राज्य शासनाने भिवंडी येथील आतकोली भागातील जमीन ठाणे महापालिकेला कचराभुमीसाठी देऊ केली आहे. ही जागा ३४.७२.०० हे. आर इतकी जमीन आहे. या जागेवर नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन (एनटीपीसी) या शासकीय कंपनीच्या माध्यमातून कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मीतीचा प्रकल्प उभारणीसाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.